योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ७९

0
161

– डॉ. सीताकांत घाणेकर


 

आजच्या जमान्यात भारतीय संस्कृतीशी असलेला संपर्क थोडा थोडा दुर्मिळ होत चाललेला दिसतो. त्यामुळे जे अनेक शब्द दैनंदिन जीवनात बोलताना आपण वापरत होतो ते शब्द हल्ली तेवढे ऐकायला मिळत नाहीत. यात मध्यवयीन तसेच तरुण पिढीही आहेच. ज्या व्यक्तींनी शालेय जीवनात आपल्या मातृभाषेत (गोव्यात- कोकणी-मराठी) शिक्षण घेतले त्यांना या शब्दांबद्दल थोडे ज्ञान आहे. पण प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घेणार्‍यांना हे शुद्ध भारतीय संस्कृतीतील शब्द ग्रीक-लॅटीन शब्दांसारखे वाटतील. अर्थात अपवाद असतीलच.
असे काही शब्द म्हणजे- साधना… स्वाध्याय..! प्रत्येक भाषेत काही विशिष्ट शब्द आहेत, त्यांचे दुसर्‍या भाषेत भाषांतर करणे फार कठीण आहे. त्यातीलच एक शब्द आहे साधना. तसाच दुसरा शब्द आहे वात्सल्य!
स्वाध्यायाचे प्रणेते पू. पांडुरंगशास्त्री आठवले म्हणूनच म्हणतात, ‘‘भाषांतर केले तर भाषेचे अंतर येते.’’ त्यामुळे संस्कृत भाषेबद्दल बोलताना ते म्हणतात की प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाची मूळ भाषा – म्हणजे संस्कृत शिकावी. म्हणजे त्यांना भारतीय संस्कृतीचे खरे दर्शन घडेल. आपली शास्त्रें, साहित्य किती उच्च दर्जाचे आहे हे कळेल. त्यातील खरा गोडवा अनुभवता येईल. यातील काही उदाहरणे म्हणजे – भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली ‘गीता’, कालिदासाचे विविध साहित्य- शाकुंतल, मेघदूत तसेच योगशास्त्र! या शास्त्राचा अभ्यास करता करता ज्यावेळी साधक विविध पैलूंचा अभ्यास करून योगाचा अनुभव व प्रामुख्याने अनुभूती घेतो तेव्हा योग ही एक उच्च कोटीची सुंदर अशी साधना आहे, हे त्याला पटू लागते. मग ते शास्त्र शिकण्याची त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. त्याची जिज्ञासा वाढत जाते.
आज अनेक व्यक्ती योग म्हणजे आसने, प्राणायाम- भस्त्रिका, कपालभाती, सूर्यनमस्कार… असे थोडेच पैलू शिकतात. काहीही न करण्यापेक्षा एवढेतरी करणे चांगलेच आहे. पण संपूर्ण शास्त्राचा थोडा थोडा अभ्यास केला तर व्यक्तीचा अपेक्षित जीवनविकास होईल. त्याला सुख-समाधान-शांती लाभेल. म्हणूनच या लेखांना ‘योगसाधना’ हे गोंडस नाव दिलेले आहे.
काही वर्षे विचार-चिंतन करता करता आम्ही राजयोगातील एक नियम- ‘स्वाध्याय’ या विषयावर सहचिंतन करीत आहोत. ‘स्वाध्याय’ हा शब्दही भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पण अनेक जणांना हा शब्दच माहीत नाही. बहुतेकांना व्याख्यान, आख्यान, भजन, कीर्तन… असे शब्द माहीत आहेत. गेले कित्येक आठवडे आम्ही या शब्दाचे अर्थ, विविध पैलू बघितले. शब्दांचा गर्भितार्थ बघितला. त्यातील तत्त्वज्ञान बघितले. असा सखोल अभ्यास करतो तेव्हा स्वाध्यायाचे मानवी जीवनात काय व किती महत्त्व आहे, हे लक्षात येते.
मानवतेच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकताना लक्षात येते की प्रत्येक युगांत व काळांत पुष्कळ व्यक्तींनी धन-संपत्ती म्हणजे पैसा यालाच सर्वस्व मानले. पण पैसा सर्व गोष्टी देऊ शकत नाही. कदाचित अनेक स्थूल गोष्टी मिळतील पण जीवनावश्यक सूक्ष्म गोष्टी पैशांनी मिळतीलच याची शाश्‍वती नाही. म्हणून पैसा व स्वाध्याय या संदर्भात शास्त्रकार म्हणतात-
* पैशामुळे उत्तम सुखसोयी मिळतील पण सुखशांती मिळेल याची खात्री नाही.
* पैशांमुळे चांगली पुस्तके मिळतील पण चांगला मेंदू म्हणजे चांगले विचार मिळतील हे सांगता येत नाही.
* पैसे देऊन झोपण्यासाठी चांगली व्यवस्था होऊ शकेल, पण चांगली शांत झोप लागेल?
* पैसे देऊन साधुला लागणार्‍या वस्तू विकत घेता येतील, पण साधुत्व, सज्जनता मिळेलच असे नाही.
* पैशांनी उत्तम जेवण विकत घेता येईल. पण जेवण रुचीने जेवू शकू याची खात्री नाही. तसेच खाल्लेले जेवण पचेल की नाही ते सांगता येत नाही.
* चांगले पैसे मोजले तर उत्तम घर, बंगला मिळेल पण ‘घर’ त्याला ‘घरपण’ असेलच हे सांगता येत नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रशुद्ध स्वाध्याय केल्यावर ज्या गोष्टी पैशांनी मिळण्याची खात्री नाही त्या गोष्टी मिळतात.
* पैसे दिले तर चैनीच्या अनेक वस्तू मिळतील पण संस्कृती मिळणार नाही.
विश्‍वाकडे नजर टाकताना हे वाक्य किती सत्य आहे हे सहज पटेल. आज चैनीच्या कितीतरी वस्तू बाजारात रोज नवीन येतात, हे सगळ्यांना माहीत आहे. त्या आसपास आहेत. श्रीमंत व्यक्ती त्या सहज खरेदी करतात. यांत विविध चैनीच्या वस्तू येतात. पण यांचा विचार न करता अति वापर केल्यामुळे आपल्या मानवी संस्कृतीचा व मुख्यत्वे भारतीय संस्कृतीचा र्‍हास होत आहे. ती नष्ट होते आहे. काही मुद्दे घेतले तर हे समजण्यास सोपे जाईल.
आजच्या मानव जातीची घोडदौड भौतिकतेकडे वळलेली आहे. त्यामुळे संस्कृती, संस्कार, आध्यात्मिकता या अत्यंत मौल्यवान पैलूंकडे दुर्लक्ष होते आहे. मानवाच्या व विश्‍वाच्या भविष्याच्या दृष्टिने ही गोष्ट बरी नाही. ‘खा, प्या, मजा करा’ याच विश्‍वात लोक जगताना दिसतात. यातच त्यांचा वेळ आणि पैसाही भरपूर खर्च होतो. याच चैनीच्या वस्तुंमध्ये अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे कपडे, जे शरीर झाकण्यासाठी तसेच शरीराचे रक्षण करण्यासाठी वापरले जातात. व्यवस्थित कपडे घालणे हे सभ्यतेचे लक्षण आहे. कपड्यांमध्येच देशाच्या संस्कृतीचे दर्शन होते.
जंगली मानव नग्नावस्थेत फिरत होता. तदनंतर पुरुष व महिला शरीराच्या विशिष्ट भागांना झाकण्यासाठी झाडांची पाने, जनावराची कातडी वापरू लागला. त्यानंतर कपड्यांचा शोध लागला. हळुहळू सर्व शरीर झाकण्याची प्रथा सुरू झाली. भारतात साडी-सलवार-कमीज असे कपडे स्त्रिया तर पुरुष धोती-कुडता-लुंगी-शर्ट-पँट असे कपडे वापरू लागले. पुढे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे तरुणांना आकर्षण वाटू लागले. त्यामुळे तेथील कपडे स्कर्ट, पँट, जीन्स, टीशर्ट असले कपडे बहुतेकजण वापरू लागले. मग त्याच्यातही निरनिराळ्या पद्धती म्हणजे फॅशन्स आल्या. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन केलेले कपडे बाजारात आले. त्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या. कपडे ही चैनीची वस्तू झाली.
श्रीमंतांचा काही प्रश्‍नच येत नाही. पण ज्यावेळी मध्यमवर्गीयदेखील त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी तो आर्थिक अडचणीत सापडतो. त्याचबरोबर कपड्यांबाबत जी नैतिकता बाळगायला पाहिजे तिचाही बळी दिला जातो. मानव परत एकदा नग्नतेकडे वळतो असे दिसते. त्यामुळे साड्या दुर्मीळ होत चालल्या आहेत. सलवार व तत्सम कपडे वाढत आहेत. दुपट्टा किंवा साडीचा पदर यांचा खरा अर्थ स्त्रिया विसरल्या आहेत. ‘गळ्यातील टायसारखाच तो गळ्याभोवती अडकवला जातो. तरुणींनी टी-शर्ट वापरला तर दुपट्‌ट्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. सारांश शारीरिक आकर्षण वाढलेले आहे. अशा कपड्यांमुळे स्त्रियांवरील अत्याचार वाढलेले आहेत.
चांगले कपडे घालायला काहीच हरकत नाही, पण ही चैन करताना आपल्या देशाच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशिष्ट चिंतन करूनच ऋषींनी ही सुंदर नैतिक संस्कृती उभी केली आहे. तिचा सांभाळ करणे हे प्रत्येक सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तीचे कर्तव्य व दायित्व आहे. त्यासाठीच हवा आहे – स्वाध्याय!