येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर उतरणार ः प्रफुल्ल पटेल

0
246

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप व कॉंग्रेस या पक्षांबरोबर युती करणार नसल्याचे काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. हे दोन पक्ष सोडून अन्य समविचारी पक्षांबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करणार असल्याचे स्पष्ट करतानाच पक्ष आम आदमी पक्षाशीही युती करणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना स्पष्ट केले.

गेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षाबरोबर युती करण्यास इच्छुक होती. मात्र, कॉंग्रेस पक्षाने ऐनवेळी युतीतून माघार घेतली होती, असे पटेल म्हणाले. निवडणुकीनंतर जेव्हा कॉंग्रेस पक्ष सर्वांत मोठा एकेरी पक्ष ठरला तेव्हा आम्ही कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यास तयार होतो. कारण आमचा एक उमेदवार विजयी झाला होता. कॉंग्रेसला राष्ट्रवादी व गोवा फॉरवर्ड पार्टीचा पाठिंबा मिळवण शक्य होते. पण त्या बाबतीत ते अपयशी ठरल्याचा आरोप पटेल यांनी केला.
यंदा भाजप व कॉंग्रेस काय करते यात आम्हाला काहीही रस नसून आमचा सगळा भर हा येत्या दीड वर्षांत पक्ष बांधणीवर असेल. त्यासाठी आतापासूनच काम सुरू करण्यात येणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

येणार्‍या काळात सदस्यता नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेले वर्षभर कोरोना महामारीमुळे पक्ष कोणतीही कामे करू शकला नाही. मात्र, आता नव्या जोमाने काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस कोणाशीही युती करणार नसल्याचे सांगितले होते.