येत्या दीड वर्षात अपघातांचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटणार!

0
20

>> गोवा पोलिसांकडून योजनेवर काम सुरू; महासंचालक आलोक कुमार यांची माहित

पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातील रस्ता अपघात किमान 15 टक्क्यांनी कमी व्हावेत यासाठीची एक योजना गोवा पोलिसांकडून तयार केली जात आहे, अशी माहिती काल राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.

हल्लीच्या दिवसांत म्हणजेच गणेशचतुर्थीनंतर राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळ्या अपघातांत अनेक वाहनचालक ठार होण्याचे सत्र राज्यात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

चालू वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील रस्ता अपघातांचे प्रमाण हे 5 टक्क्यांनी, तर पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ते प्रमाण आणखी 10 टक्क्यांनी खाली आणण्यासाठीची योजना तयार केली जात असल्याचे आलोक कुमार यांनी सांगितले.

राज्यात दरदिवशी रस्ता अपघातात सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू होत असतो, असे दिसून आले आहे. मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालू वर्षी राज्यातील 7500 जणांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती देखील महासंचालकांनी दिली.
गेल्या शनिवारी पेडणे येथे दुचाकी व ट्रक या वाहनात झालेल्या एका अपघातात तीन महिला ठार झाल्या होत्या. तसेच त्याचदिवशी रात्री झालेल्या अपघातात दोघे तरुण ठार झाले होते. याशिवाय सोमवारी झालेल्या दोन अपघातांत एक टेम्पोचालक आणि एक महिला ठार झाली होती. तीन दिवसांत 7 जणांचे अपघातात बळी गेल्याने विरोधी पक्ष व लोकांनीही वाढत्या रस्ता अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार व पोलिसांनी पावले उचलावीत, अशी मागणी केली होती.

अपघातांची कारणे शोधा

>> संबंधित सर्व सरकारी खात्यांना सूचना

उत्तर गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत वाहन अपघातांतील मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच अपघातांची कारणे शोधण्याची सूचना सर्व संबंधित खात्यांना करण्यात आली.
उत्तर गोवा जिल्ह्यातील रस्ता व्यवस्थापनाशी संबंधित सर्व खात्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून वाहन अपघातांचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे.
उत्तर गोव्यातीलवाहन अपघाताची कारणे शोधून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना सरकारी खात्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती रोलँड मार्टिन्स यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.