येणार्‍या काळात महिला पूर्ण सक्षम बनतील

0
137
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

शरीरसौष्ठव, बळ आणि ताकदीचे निकष असते तर सारे पैलवान शासनकर्ते बनले असते. त्यामुळे भविष्यात पुरुषांना मागे टाकून महिला अनेक पावले पुढे जाणार आहेत..

समाजात अन्य अपराधांबरोबर बलात्कारही होतात. परंतु उपहास या गोष्टीचा आहे की नारी चेतनेचा प्रसार, शिक्षणाचा विस्तार, आधुनिकतेला वाव आणि कायदा-नियमाच्या सक्तीनेही बलात्कारासारखे अपराध घडतात. अशा गुन्ह्यांमागील मुख्य कारण म्हणजे पुरुषांद्वारे महिलांना कामवासनेच्या पूर्तीसाठीचे साधन मानणे आणि महिलेची इच्छा-संमती निरर्थक समजण्याच्या परंपरागत दृष्टीकोनात काही खास बदल झालेला नाही, हे दर्शविते. बलात्कारीत, पीडित महिलेच्या मानसिक, शारीरिक आणि नैतिक वेदनेबरोबर तिला सामाजिक अवहेलना झेलावी लागते, कारण ती अपवित्र गणली जाते. इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्येबरोबर दुर्व्यवहार केला तेव्हा भयानक सामाजिक दंड इंद्राला नव्हे तर अहिल्येला भोगावा लागला, अशी दुहेरी आणि अन्यायपूर्ण सामाजिक विचारसरणी अशा गुन्ह्यांना उत्तेजन देते. लज्जा हे महिलांचे आभूषण मानले गेले आहे. ही मान्यता महिलांना आपले तोंड बंद ठेवण्यास भाग पाडते. विविध समस्या आणि कुप्रथांनी महिलाजातीला आपल्या समाजात हीन अवस्थेला पोचवले आहे. ‘बाईची अब्रू लुटली’ अशा भाषाप्रयोगांचा वापर आता करणे सोडले पाहिजे. कायदा, प्रशासन, शिक्षण, जागरूकता आणि स्वयंसेवी संघटना कार्यरत असूनही शहरात आणि महानगरात बलात्काराची व्यापकता आणि क्रूरता या काही वर्षांत ज्या तर्‍हेने समोर येत आहे, ते पाहता ती आमच्या संस्कृती आणि भौतिक विकासाच्या चेहर्‍यावर जोरदार चपराक आहे. अशा घटना आपल्या सभ्य समजल्या जाणार्‍या समाजास एक विकृत रोग जडल्याचे निदर्शक आहे.

एक वर्ग बलात्काराच्या घटना टाळण्यासाठी वेश्याव्यवसाय कायदेशीर करावा या मताचा आहे, हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर या स्वरुपाचे आहे. यातून महिलांच्या शोषणाला कायदेशीर स्वरुप प्राप्त होईल. अनैतिकतेला प्रोत्साहन आणि स्वैराचाराला उत्तेजन मिळेल. काही समाजांत तर महिलांच्या कौमार्याला नैतिकता आणि सामाजिक स्तरावर अत्याधिक महत्त्व आहे, तर पुरुषांच्या कौमार्याला साधारणही महत्त्व नाही. एका महिलेने अशी तक्रार केली होती की, तिच्या पतीने आपल्या बढतीसाठी तिच्या अधिकार्‍यांसोबत शारीरिक संबंध जोडण्यास प्रवृत्त केलेे. ही वृत्ती महिलेला भोग्य वस्तू मानण्याच्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. मातृत्व हे महिलांसाठी वरदान असले तरी काही ठिकाणी त्याचा वापर बेडीच्या स्वरुपात केला जातो. गर्भावस्थेत महिलांची शारीरिक क्षमता सामान्य नसते. प्रसव आणि नंतर मुलांच्या पालनपोषणात गुंतवून ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे महिलांना अपत्यासाठी सक्ती केली जाते. सामाजिक संस्कारांच्या वशीकरणाने महिलाच महिलांविरुद्ध अत्याचारात सामील होऊन कन्येने जन्म घेताच तिचा गळा दाबण्याचे भयंकर कृत्य करतात. पुरातन पंथीय नवजात कन्येचा गळा दाबणार आणि तथाकथित आधुनिक लोक या जगात येण्याआधी लिंगाची माहिती मिळवून गर्भातच तिची हत्या करणार, असा विचित्र चक्रव्यूह अवतीभोवती फिरत आहे. वास्तविक शारीरिक ताकद वगळता सर्व बाबतीत महिला पुरुषांपेक्षा काकणभर सरस आहेत. दिवसभर राबण्याचे सामर्थ्य पुरुषांपेक्षा त्यांच्यात जास्त आहे. त्या प्रकृतीने दणकट असतात. त्या एखाद्या मोठ्या आजाराशी सहज भिडू शकतात. त्यांच्या तुलनेत पुरुष आजारात लगेच हतबल होतो. साक्षरतेचे आकडे महिलांच्या शिक्षण प्रसाराचे संकेत दर्शवतात.

शिक्षणात उच्च श्रेणीत आणि सर्वाधिक संख्येने उत्तीर्ण होण्याच्या संख्येत मुलींची संख्या जास्त असते. महिला पुरुषांपेक्षा अधिक सहनशील असतात. केवळ शारीरिक ताकद या एकाच गोष्टीपासून महिला वंचित असल्या तरी भविष्यात ताकदीशिवाय समाजाचे अडणारे नाही, कारण ‘दगड उचलणे, खड्डा खणणे’ अशी ताकदीची कामे यंत्रांद्वारे केली जात आहेत. शरीरसौष्ठव, बळ आणि ताकदीचे निकष असते तर सारे पैलवान शासनकर्ते बनले असते. त्यामुळे भविष्यात पुरुषांना मागे टाकून महिला अनेक पावले पुढे जाणार आहेत. आधी आर्थिक परावलंबनाने महिलांना दुर्बळ बनवले. आता अनेक महिला पुरुषांपेक्षा अधिक कमावतात. आज पंचायत, नगरपालिका महिलांसाठी आरक्षणातून भविष्यात महिलांची सत्तेत भागीदारी पक्की झाली असली तरीही संसद आणि विधानसभेत अशा तर्‍हेचे आरक्षण अडवून अनेक घोषणा देऊनही महिलांना सत्ते भागीदारी मिळत नाही. महिलांना समाजात सहयोगी करून घेतले पाहिजे. त्यांना प्रतियोगी म्हणूनच नव्हे.

भारतीय महिलेने पाश्‍चिमात आत्मघातकी प्रकृतीचे अंधानुकरण न करता आपल्या संस्कृतीला अनुकूल असेच घट्ट, मजबूत बनणे आवश्यक आहे. स्त्री-पुरूष बरोबरीचे आहेत. याचा अर्थ असा नव्हे की ती पुरुषासारखी असेल. विकसित महिलेचा अर्थ ‘नकली पुरुष’ नव्हे. महिलेची प्रतिष्ठा फक्त वीरमाता तथा वीरपत्नी अशी सीमित न राहता तिला वीरांगना व्हावे लागेल. वीर पुरुषासारखे वीर महिला बनणे स्वतःला गर्व, भूषण वाटले पाहिजे.

महिलांसाठी सरकारने कायदे केले, ते त्यांच्यावरील वाढत्या अत्याचाराला समोर ठेवून. हे कायदे अधिकाधिक कडक होत गेले. परंतु यातून महिलांकडून दुरुपयोगाचा धोका वाढू लागला अशा घटना दुर्दैवाने घडत आहेत. पुरुष, पोलीस, कायदा सर्वदृष्टीने महिलांचे संरक्षण करू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते- जोपर्यंत महिला स्वतः आपल्या विकासासाठी पुढे येत नाहीत तोपर्यंत तिचा पूर्ण विकास संभव नाही. आधुनिक महिला आपली ओळख केवळ माता, पत्नी, कन्या अशा नात्यांतून देत नाही, तर एक जबाबदार नागरिक बनून देशाच्या विकासात भरारी घेत आहे. महिला आज आर्थिक पराधिनतेच्या जगण्यापासून मुक्त होण्यासाठी धडपडत आहे. लाचारीचे जीवन सोडून सन्मानपूर्वक जीवन जगत आहे. प्राचार्या, शिक्षिका, डॉक्टर, वकील, इंजिनियर, मॅनेजर, नर्स, टेलिफोन ऑपरेटर, सेल्स गर्ल, लेखिका, संपादिका, निवेदिका, स्टेनो, कंडक्टर, पायलट, विमा एजंट, इत्यादी अनेक क्षेत्रांत आपले पाय रोवत आहे. जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे तिने पुरुषांच्या समान काम केले आहे. देशातील अर्धी लोकसंख्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी पूर्णपणे झटत आहे. तरीही महिलांसाठी समाजात ‘अबला’ शब्द वापरला जातो. महिलांशी भांडण करणे, कमीपणाचे लक्षण समजले जाते आणि पुरुषांना त्यांच्या नालायकपणाची जाणीव करून देण्यासाठी बांगड्या पाठविल्या जातात, जी दुर्बलतेची, सहनशीलता तथा भय ही महिलांची विशेषता असल्याच्या समजुतीने. अजूनही काही समाजात बुरखा प्रथेने महिलांना बंदिस्त केले आहे. रूढी-परंपरेच्या नावाखाली अजूनही बालविवाहातून विविध समस्या आणि वेश्याव्यवसायाला चालना मिळत आहे. हुंडाप्रथेने कन्येने जन्म घेणे अप्रिय घटना बनली आहे. महिला जेव्हा घरात बंदिस्त होती तेव्हा तिच्यासमोर भरपूर समस्या होती आणि आता ती घर ओलांडून समाजात वावरू लागल्यानंतर ही आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्ग शोधत आहे. जगात आज सर्वच समाजात विविध स्वरुपात स्त्री-पुरुष समानतेची चळवळ चालू आहे. स्त्री-पुरुष भेदाच्या कल्पनेने जगाला जे वेढले आहे आणि रूढी, परंपरेच्या बेड्यात अडकलेल्या महिलांची सुटका केली पाहिजे. कारण महिला या विशाल समाजाचा भाग असल्यामुळे तिची प्रत्येक समस्या शेवटी समाजाची आहे.