मोदी सरकारकडून साबांखाला १८ हजार कोटी

0
148
????????????????????????????????????

>> साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

>> ९ हजार कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर

सार्वजनिक बांधकाम खात्याला केंद्र सरकारकडून विकासकामांसाठी एकूण १८ हजार कोटी रु. एवढा निधी मिळणार असून ९ हजार कोटी रु. एवढा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिली. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने चार वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्राने गोव्याला विकासकामांसाठी गेल्या चार वर्षांच्या काळात सुमारे ३० हजार कोटी रु. मंजूर केलेले असून आपल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आतापर्यंत ९ हजार कोटी रु. एवढा निधी मंजूर केलेला आहे. आणखी ९ हजार कोटी रु. सार्वजनिक बांधकाम खात्याला मिळणार आहेत. त्यासाठीच्या प्रकल्पांना केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.
गोव्याचे सुमारे ९ हजार कोटी रु.चे प्रकल्प २०१६ साली केंद्राने मंजूर केले होते. या प्रकल्पांचे काम आता जोराने चालू असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. त्यात राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे रस्ते, पूल, सांडपाणी प्रकल्प, उड्डाण पूल, भुयारी मार्ग आदींचा समावेश असल्याचे ढवळीकर म्हणाले.

केंद्राने मंजूर केलेल्या प्रकल्पांत पत्रादेवी ते करासवाडा महामार्ग, करासवाडा ते बांबोळी, बांबोळी ते जुवारी पूलपर्यंत महामार्ग, जुवारी पूल ते वेर्णे उड्डाण पूल, वेर्णे ते चार रस्ता महामार्ग, चाररस्ता ते पोळे महामार्ग (गालजीबाग व तळपण या दोन पुलांसह), वेर्णे ते लोटली क्रॉसिंग लिंक, खांडेपार पूल, कुर्टी बगलमार्ग (उड्डाण पुलासह), ढवळी बगलमार्ग (तीन भुयारी मार्गांसह) या प्रकल्पांचा समावेश आहे.

आणखी ९ हजार कोटींच्या
विकासकामांना तत्त्वतः मान्यता
वरील कामांबरोबरच केंद्र सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आणखी ९ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यात मोले ते खांडेपार रस्ता, जुने आरटीओ कार्यालय ते जुने गोवे रस्ता, बाणस्तारी पूल, बोरी पूल, करासवाडा ते खांडेपार रस्ता, मुरगाव बंदर ते दाबोळी विमानतळ उड्डाण पूल (८ कि. मी., ५५० कोटी खर्च), अस्नोडा पूल, डिचोली पूल, साखळी पूल, पाळी पूल, भारतमाला योजनेंतर्गत महत्त्वाच्या पर्यटन स्थळी रस्ते, सागरमाला योजनेखाली अस्तित्त्वात असलेल्या व नव्या मिळून सहा जेटींची दुरुस्ती व बांधणी (९७ कोटी रु. खर्चून), दुर्भाट, जुने गोवे, हळदोणा येथील जेटींची दुरुस्ती तर पणजी, सावर्डे, दोनापावला येथे नवीन जेटी बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री सडक योजनेखाली ग्रामीण भागांना राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यासाठी २३९ कोटी केंद्राकडून मिळणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विकासकामांचा सपाटाच लावला असल्याने गोव्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचे ढवळीकर म्हणाले.

…तरच मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी जर तुमच्यावर सोपवण्यात आली तर ती स्वीकारणार आहात काय, असे काल पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांना विचारले असता मी करीत असलेले काम जनतेला आवडत असेल व मुख्यमंत्री व्हावे असे त्यांना वाटत असेल तर आपली तयारी आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले. मात्र, त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत त्याबाबत बोलणे हे योग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार खूप चांगले काम करीत असल्याचे प्रमाणपत्र तुम्ही स्वतःच दिलेले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्ष भाजपबरोबर युती करील असे समजायचे का, असे विचारले असता ढवळीकर म्हणाले की त्याबाबतचा निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही. मगो पक्षाची केंद्रीय समितीच त्याबाबत योग्य काय तो निर्णय घेईल. मगो पक्षाचा केंद्रातील एनडीएत समावेश नसल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.