यूपीत अंतिम टप्प्यात ६० % मतदान

0
77

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अंतिम (सातव्या) टप्प्यात काल ४० जागांसाठी १.४१ कोटी मतदारांपैकी ६० टक्केच्या वर मतदान झाले. संध्याकाळी ५ पर्यंत ६०.०३% मतदान झाल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी टी. व्यंकटेश यांनी सांगितले. २०१२ साली झालेल्या निवडणुकीत वरील ४० मतदारसंघांमध्ये ५७.९२ टक्के मतदान झाले होते.

काल शेवटच्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ५ पर्यंत ६०.९५% मतदान झाले होते. मोदींनी वाराणसीत सलग तीन दिवस तळ ठोकून झंझावाती प्रचार केला असल्याने वाराणसीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान आज (बुधवार) पार पडणार आहे. एकूण ४० विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होत असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांचा मतदारसंघांचा समावेश असल्याने सर्वांच्या नजरा वाराणसीकडे लागल्या आहेत. सोनभद्र, मिर्झापूर व चंदौली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सरासरी ६० टक्के मतदान शांततेत पार पाडले. या जिल्ह्यांबरोबरच गाझीपूर, जौनपूर व भडोई येथे उत्स्फूर्त मतदान झाले. कडेकोट बंदोबस्तात सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर दुपारनंतर मतदान गतिमान झाले. नक्षलग्रस्त भागात मतदान संध्याकाळी ४ पर्यंत घेण्यात आले. जौनपूर जिल्ह्यातील जफराबाद मतदारसंघाचे भाजप उमेदवार हरेंद्र प्रताप सिंह व त्यांच्या ४ समर्थकांना मतदारांना केंद्रावर घेऊन येत असल्याने अटक करण्यात आली. मात्र, सिंह यांनी आरोप फेटाळले आहेत.
सन २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत या ४० विधानसभा मतदारसंघांपैकी २३ जागा समाजवादी पक्षाने, पाच बसपने, ४ भाजपने, तीन कॉंग्रेसने तर उर्वरित पाच जागांवर इतर पक्षांनी विजय मिळवला होता. यंदा रिंगणात एकूण ५३५ उमेदवार असून भाजपचे ३२, बसपचे ४०, समाजवादी पक्षाचे ३१, कॉंग्रेसने ९, राष्ट्रीय लोक दलाचे २१ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५ उमेदवार नशीब अजमावत आहेत.

मणिपूरमध्ये शेवटच्या
टप्प्यात ८३ % मतदान
इंफाल मणिपूरमध्ये दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात सहा जिल्ह्यांतील २२ मतदारसंघांसाठी काल विक्रमी ८३% मतदान झाले. किरकोळ घटना सोडल्यास मतदान शांततेत झाले. मतदानाला सकाळी ७ वाजता प्रारंभ होण्यापूर्वीच महिला तसेच पुरुष मतदारांनी गर्दी केली होती. संध्याकाळी ३ वाजता मतदान पूर्ण झाले तेव्हा टक्केवारी ८३ वर पोचली होती. अंतिम आकडेवारीनंतर ती वाढणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ४ मार्च रोजी पहिल्या टप्प्यात ३८ जागांसाठी ८६.५ टक्के मतदान झाले होते. २२ जागांसाठी ४ महिला उमेदवारांसह ९८ जण रिंगणात आहेत. सगळ्यांच्या नजरा मुख्यमंत्री ओक्रम इबोबी सिंग रिंगणात असलेल्या थाऊबल मतदारसंघाकडे लागल्या आहेत.