यूपीतून अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

0
100

>> स्वातंत्र्यदिनी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये काल रविवारी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून स्वातंत्र्यदिनी उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट यामुळे उधळल्याची माहिती एटीएसने दिली आहे. अटक करण्यात आलेले अल कायदाचे दहशतवादी उत्तर प्रदेशमधील लखनऊसह काही जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन प्रेशर कुकर बॉम्बसह बरीच स्फोटके व विदेशी पिस्तुले जप्त केली आहेत.

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने काल लखनऊमध्ये छापा टाकला त्या घरात सात लोक राहत होते आणि त्यातील पाचजण पळून गेले असून ते कानपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मिनहाज अहमद, मसरुद्दीन अहमद अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्अटक केलेल्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली असून त्यांनी एक मोठा कट रचला होता. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाला घातपात घडवून यूपी हादरवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती दिली.

कोलकातात तीन दहशतवादी अटक
कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) काल रविवारी तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करत, घातापाताचा मोठा कट उधळला. हे तिन्ही दहशतवादी जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेशचे सदस्य आहेत.

या तिघांनाही एसटीएफने काल दुपारी दक्षिण कोलकातामधील हरिदेवपूर भागातून अटक केली. हे तिन्ही संशयित दहशतवादी काही महिन्यांपासून भाडेतत्वावर खोली करून राहत होते. याबाबत पोलिसांनी, त्यांच्या फेसबुक खात्यांची तपासणी केली गेली आहे.