आप-भाजप कार्यकर्ते नुवेत पुन्हा भिडले

0
116

>> आमदार डिसा यांनी माफी मागण्याची आपची मागणी

कॉंग्रेसच्या दहा आमदारांनी पक्षत्याग करून भाजपात प्रवेश केलेल्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. याबद्दल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या त्या आमदारांना केक वाटण्याचे ठरवून त्याप्रमाणे नुवे येथे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्या निवासस्थानी ते गेले. त्यावेळी आपचे कार्यकर्ते व डिसा यांचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली होती. हे प्रकरण शनिवारी घडले होते. त्यानंतर काल रविवारी दुपारी पुन्हा नुवे येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक, धक्काबुक्की झाली. शेवटी पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

सुमारे एक तास नुवे येथे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत ही धुमश्‍चक्री चालू होती. या घटनेमुळे नुवे येथे तंग वातावरण झाले होते.
प्रतिमा कुतिन्हो यांनी याबाबत सांगितले की, शनिवारी डिसा यांच्या पत्नीने आपच्या कार्यकर्त्यांना अपशब्द वापरत शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो. यावेळी आम्ही डिसा यांच्या पत्नीने आमची माफी मागावी अशी मागणी आम्ही केली. याबाबत आमदार डिसा यांनी आम आदमी पक्षाच्या या कृतीचा निषेध केला. प्रतिमा कुतिन्हो ह्या प्रसिद्धीसाठी स्टंट करतात हे सर्वश्रुत आहे. आपण कॉंग्रेसमधून भाजपात फक्त या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विकासकार्यात मदत केली. प्रतिमा कुतिन्हो मात्र कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून केवळ पैशांसाठी आम आदमी पक्षात गेल्या असल्याचा आरोप केला.

आपचे प्रदेशाध्यक्ष राहुल म्हांबरे, उपाध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो आणि आपचे कार्यकर्ते आल्याचे पाहून आमदार डिसा यांचेही कार्यकर्ते उपस्थित झाले. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजीही करण्यात आली.