सी-सॅट परीक्षा : परीक्षार्थींच्या दबावानंतर सरकारचा तोडगा
यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवा परीक्षांसाठी लागू करण्यात आलेली सी-सॅट चाचणी रद्द करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध चालू केला आहे. त्याची दखल घेत, ही परीक्षा कायम राहील मात्र त्यातील इंग्रजीचे गुण ग्रेडींगसाठी व गुणवत्ता यादी ठरविण्यासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असे सरकारकडून काल लोकसभेत सांगण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थी मात्र अजून नाराज असून सी-सॅट चाचणीच रद्द करावी, ही मागणी त्यांनी कायम ठेवली आहे.
दरम्यान, मुलकी सेवा प्राथमिक परीक्षा या केलेले बदल कायम ठेऊन ठरल्यानुसार २४ ऑगस्टलाच होतील, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुलकी सेवा अभिक्षमता चाचणीत (सीएसएट) २० गुणांचे इंग्रजी प्रश्न असतात. हे गुण विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे प्राथमिक परीक्षेचा निकाल एकुण ४०० गुणांऐवजी ३८० गुणांच्या आधारे ठरविण्यात येईल. अर्थात या प्रस्तावाला केंद्रीय लोकसेवा आयोगाने अजूनपर्यंत अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही.
दरम्यान, २०११ साली प्राथमिक परीक्षा देणार्यांना २०१५ मध्ये आणखी एकदा संधी देण्यात येणार असल्याचेही कार्मिक खात्याचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी सभागृहाला सांगितले.
दरम्यान, यूपीएससी परीक्षेच्या मुद्द्यावरून काल राज्यसभेत गदारोळ झाला, त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.
दरम्यान, परीक्षार्थी केंद्राच्या निर्णयाने समाधानी नसून त्यांनी सी-सॅट रद्द करण्याची मागणी कायम ठेवली आहे. याप्रश्नी विद्यार्थी गेल्या २५ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. काल उत्तर दिल्लीतील मुखर्जी नगर येथून त्यांनी आपले ठिकाण आता जंतर मंतर येथे हलविले आहे.