यूएस-कोरिया प्रजासत्ताक अंतिम फेरीत दाखल

0
98

>>एआयएफएफ यूथ कप

जोशवा थॉमसने नोंदलेल्या दोन गोलांवर अमेरिकेने मलेशियाचा २-१ असा पराभव करून एआयएफएफ युथ कप (अंडर-१६) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
टिळक मैदानावर (वास्को) झालेल्या या सामन्यात विजेता अमेरिकन संघ मध्यंतराला २-० असा आघाडीवर होता. कर्णधार जोशवा थॉमस सार्जेंटने हे दोन्ही गोल नोंदले. मलेशियाचा एकमात्र गोल ८५व्या मिनिटाला जैनुल अरिफिन बिन अहमद लतिफीने नोंदला. उत्तरार्धात अमेरिकेला दहा खेळाडूनिशी खेळावे लागले पण त्यानी आपली आघाडी अबाधित राखली आणि चार सामन्यातून ८ गुण जमवित दि. २५ रोजी होणार्‍या अंतिम फेरीत स्थान मिळविले.
पूर्वार्धात बव्हंशी वर्चस्व गाजविलेल्या अमेरिकेने १७व्या मिनिटाला पेनल्टीवर आघाडी घेतली. गोलप्रयत्नातील निकोलो लेमोइनेला मलेशियाच्या बचावपटूने गोलक्षेत्रात पाडल्याने पंच तेजस नागवेकरने पेनल्टी दिली आणि त्यावर अमेरिकेचा कर्णधार जोशवा थॉमसने आघाडीचा गोल केला.
४४व्या मिनिटाला निकोलोच्याच क्रॉसवर जोशवा थॉमसने हेडरद्वारे गोल नोंदवित अमेरिकेची आघाडी २-० अशी बनविली.
उत्तरार्धात ५६व्या मिनिटाला मलेशियाच्या मुहम्मद बहरूद्दिनला अनावश्यकरीत्या धडक दिल्याप्रकरणी पंचानी अमेरिकेच्या केविन रॉबर्टोला रेड कार्ड देऊन बाहेर काढले आणि त्याना दहा खेळाडूनिशी खेळावे लागले.
मलेशियाने या अनुकुलतेत जोरदार आक्रमणे केली खेळ संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना झैनुलने गोल नोंदवित अमेरिकेची आघाडी २-१ अशी घटविली.
भारत-कोरिया प्रजासत्ताक लढत गोलशून्य
दरम्यान, भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यात झालेली महत्त्वपूर्ण लढत गोलशून्य बरोबरीत संपली. त्यामुळे भारतीय युवा संघांच्या अंतिम फेरीत धडक देण्याच्या आशा संपुष्टात आल्या. या बरोबरीमुळे कोरिया प्रजासत्ताक संघाची गाठ आता यूएसए संघाशी पडणार आहे. तर मलेशियना आणि टांझानिया यांच्यात तिसर्‍या व चौथ्या स्थानासाठी लढत होईल. भारतीय संघाचे ४ सामन्यातून एकूण २ गुण झाले.