पर्वरीतील घटना; मुख्य संशयित फरार; शोध सुरू
पर्वरीत मंगळवारी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. शवचिकित्सेत सदर युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी 22 ते 25 वयोगटातील पाच युवकांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित विकास यादव हा फरार आहे. मृत युवकाचे नाव रेहबर खान (21, रा. आम्रोह, उत्तर प्रदेश) असे आहे. रेहबर खान हा मुख्य संशयिताच्या प्रेयसीची सतावणूक करत असल्याने त्या रागातून संशयितांनी त्याला संपवले.
पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी चोगम मार्गावर एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉमध्ये शवचिकित्सेसाठी पाठविला असता शरीरावर काही जखमा आढळल्याचे निष्पन्न झाले. त्यातून सदर युवकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर युवकाची ओळख पटवली असता तो रेहबर खान असल्याचे समोर आले. तो हल्लीच चोगम मार्गावरील एका हेअर सलूनमध्ये हेअर ड्रेसर म्हणून कामाला लागला होता.
पोलिसांनी तपासाला गती देत पाच संशयितांना अटक केली. त्यात खतेश कांदोळकर, सुमन बारीक, सचिन सोहनी, तनय कांदोळकर, सचिन सिंग यांचा समावेश आहे. हे सर्वजण 22 ते 25 वयोगटातील असून, सर्व जण कांदोळी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित विकास यादव हा अद्यापही फरार आहे. त्याच्या मागावर सध्या पोलीस आहेत. मुख्य संशयिताच्या प्रेयसीची रेहबर खान हा सतावणूक करत असल्याने संशयितांनी त्याचा काटा काढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.