युरो चषक फुटबॉल, फ्रेंच ओपन स्पर्धा पुढे ढकलल्या!

0
138

>> कोरोनाचा क्रीडा जगताला जरबदस्त फटका

>> अनेक स्पर्धा रद्द

‘कोरोना विषाणू’चा जोरदार फटका जागतिक क्रीडा विश्वाला बसला आहे. या व्हायरसच्या भीतीमुळे अनेक प्रतिष्ठित स्पर्धा पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मानाच्या अशा युरो चषक फुटबॉल स्पर्धा आणि फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धांचाही समावेश आहे.
युरो चषक स्पर्धा यंदा १२ जून ते १२ एप्रिलपर्यंत खेळविण्यात येणार होती. परंतु खेळाडूंच्या भवितव्याचा तसेच कोरोना व्हायरसच्या पादुर्भावाचा विचार करून आता यंदाच्या वर्षी ही स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
आता ही प्रतिष्टेची स्पर्धा पुढील वर्षी २०२१ मध्ये होऊ घेण्यात येणार आहे. स्वीडनच्या फुटबॉल संघटनेने ही माहिती दिली आहे.

फ्रेंच ओपन स्पर्धाही पुढे ढकलली
पॅरिस ः कोरोनाच्या भीतीमुळे प्रतिष्ठेची अशी फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धाही पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. यंदाची फ्रेच ओपन स्पर्धा मे २४ ते जून ७पर्यंत होणार होती. परंतु कोरोनामुळे या स्पर्धेच्या तयारीला योग्य तो वेळ मिळणे कठीण असल्याने ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता ती २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत खेळविली जाणार आहे. त्यामुळे यूएस ओपन स्पर्धेनंतर एका आठवड्याभरात फ्रेंच ओपन स्पर्धा सुरू होणार आहे.

कोरोनामुळे स्पेनमधील युवा
फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे स्पेनमधील एका युवा फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. ऍथलिटको पोर्टाडा क्लबचा २१ वर्षीय प्रशिक्षक फ्रासिस्को गार्सिया याला कोरोना विषणूची लागण झाली होती आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. फ्रासिस्कोचे वय फक्त २१ वर्ष होते. फ्रासिस्को कर्करोगावरही उपचार करत होता. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. याच काळात त्याला करोनाची लागण झाली आणि अखेर त्याला आपल्या जीवाला मुकावे लागले. इटलीत गेल्या २४ तासात ३४९ तर स्पेनमध्ये १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमधील एका क्लबचे
३५ टक्के खेळाडू कोरोना बाधित
दरम्यान, स्पेनमधील एफसी व्हेलेंसिया या क्लबच्या ३५ टक्के खेळाडू आणि कर्मचार्‍यांना कोरोनाने ग्रासले आहे. सदर क्लबच्या प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आम्ही उर्वरित कर्मचारी आणि खेळाडूंना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत. फुटबॉल क्लबने परिपत्रक काढून प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

इटलीतील ‘सिरी ए’ लीगच्या
११ खेळाडूंना कोरोनाची बाधा
दरम्यान, इटलीतील ‘सिरी ए’ या फुटबॉल लीगमध्ये खेळणार्‍या विविध क्लबमधील एकूण ११ खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. काल फिओंरेटिना संघाकडून खेळणार्‍या आणखी चार खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर ’सिरी ए’ फुटबॉल स्पर्धा ३ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. केवळ हीच नव्हे तर इटलीतील अनेक क्रीडा स्पर्धा या स्थगित करण्यात आल्या असून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पाकिस्तान सुपर लीगचे
प्लेऑफ सामने रद्द
दरम्यान, इंग्लंडचा क्रिकेटपटू ऍलेक्स हेल्स याला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याच्या संशयाने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील प्ले ऑफचे सामनेच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेल्स कराची किंग्स संघाकडून खेळत होता. हेल्स माघारी परतला असला तरी धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्यााची माहिती पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी दिली. पाकिस्तानमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.