Home Featured युद्धात नुकसानापेक्षा निकाल महत्त्वाचा

युद्धात नुकसानापेक्षा निकाल महत्त्वाचा

0

>> चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांचे प्रतिपादन; पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबवणे हाच ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश

पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया करता कामा नये आणि पाकिस्तानमधून होणारा राज्य पुरस्कृत दहशतवाद थांबवणे हा ‘ऑपरेशन सिंदूर’ मागचा मूळ विचार होता. संघर्षादरम्यान नेहमीच जोखीम असते; पण तुम्ही जोखीम घेतली नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. सैन्य म्हणून आम्हाला नुकसान आणि अपयशाचा त्रास होत नाही. आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. कारण युद्धात नुकसानापेक्षा निकाल महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात काल केले. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरदरम्यान युद्ध आणि राजकारण समांतर पातळीवर सुरू होते. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सीडीएस अनिल चौहान यांनी पुणे विद्यापीठात ‘भविष्यातील युद्ध आणि युद्धकला’ या विषयावर आयोजित केलेल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती सांगितली.

अनिल चौहान यांनी शनिवारी सिंगापूरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भाष्य केले होते. खरा मुद्दा किती विमाने पाडली गेली हा नाही तर ती का पाडली गेली हा आहे? आणि आम्ही त्यांच्यातून काय शिकलो हा आहेे, असे विधान चौहान यांनी केले होते. त्यावरून मोठे राजकारण पेटले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुणे विद्यापीठातील हे नवे विधान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. 7 मे रोजी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. त्यानंतरही पुढच्या तीन दिवसांत पाककडून झालेल्या द्रोन हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. अखेर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओंनी फोनवरून भारताचे डीजीएमओंशी चर्चा केली आणि शस्त्रविराम जाहीर करण्यात आला होता.
पहलगाममध्ये जे घडले ते क्रूर होते. डोळ्यांदेखत कुटुंबातील सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना धर्माच्या नावाखाली मारण्यात आले. भारत सर्वाधिक दहशतवादी कृत्यांचा बळी ठरला आहे. आतापर्यंत जवळपास 20 हजार लोक दहशतवादी हल्ल्यांत मारले गेले आहेत, असेही अनिल चौहान यांनी सांगितले.
यावेळी अनिल चौहान यांनी सशस्त्र दलांना उद्देशूनही भाषण केले. मला वाटते की सैनिकांवर अपयश आणि नुकसानीचा परिणाम होत नाही. युद्धादरम्यान अडथळे आले, तरीही मनोबल उंच राहिले पाहिजे. काय चुकले हे तुम्हाला कळलं पाहिजे, त्या चुका सुधारून पुढे जाता आले पाहिजे. तुम्ही भीतीच्या छत्रछायेत राहता कामा नये, असे चौहान म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर हे युद्ध रणनीतीचे एक उदाहरण होते, ज्यामध्ये कायनॅटिक आणि नॉन-कायनॅटिक युद्ध कौशल्यांचा वापर केला गेला. या युद्धादरम्यान तीन ट्रेंड उदयास आले, जे भविष्यातील युद्धाची रुपरेषा निश्चित करतील. पहिला म्हणजे या युद्धादरम्यान सेन्सर तंत्रज्ञान खूप महत्वाचे होते. आपल्याकडे नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही सेन्सर्स आहेत.
दुसरे म्हणजे या युद्धात ब्रह्मोस सारख्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी आणि स्टेल्थ तंत्रज्ञानाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. तिसरे म्हणजे यामध्ये मानवरहित प्रणाली, स्वायत्त प्रणालींचा समावेश आहे. मानवयुक्त रणगाडे आणि मानवरहित रणगाडे इत्यादी खूप महत्वाचे असल्याचे सिद्ध झाले, कारण भविष्यातील युद्धांमध्ये यामुळे मानवी धोका कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूरनंतर 5 मिनिटांत पाकला फोन
यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी मोठा खुलासा केला. दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर 5 मिनिटांनी पाकिस्तानला त्याविषयीची माहिती देण्यात आली. पण जेव्हा पाकिस्तानकडून आव्हानात्मक भाषा वापरली जाऊ लागली, तेव्हा आम्हीही ठणकावले की जर पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला, आमच्या लष्करी तळांवर हल्ला केला, तर आम्हीही अधिक आक्रमकपणे त्यांच्यावर हल्ला करू, असेही चौहान यांनी सांगितले.

पाकची 8 तासांत माघार
पाकिस्तानने 10 मे रोजी मध्यरात्री 1 वाजता जाहीर केले होते की भारताला 48 तासांत गुडघे टेकायला लावणार. त्यानंतर त्यांनी सीमेपलीकडून हल्ले चालू केले. त्यांनी हा वाद आणखी चिघळवला. भारताने फक्त तिथल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य केले होते. पाकिस्तानने ज्या लष्करी कारवाईसाठी 48 तास सांगितले होते, ती मोहीम त्यांना अवघ्या 8 तासांत आटोपती घ्यावी लागली. त्यांनी लगेच फोन लावला आणि शस्त्रविरामाची चर्चा केली, असे अनिल चौहान म्हणाले.