काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नरेंद्र मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोन कॉलवर मोदींनी शरणागती पत्करल्याची खोचक टीकाही राहुल गांधींनी केली. तसेच काँग्रेसच्या ताकदीवर राहुल गांधीनी भाष्य करताना, काँग्रेस पक्ष महासत्तांसमोर झुकत नाही, असे नमूद केले.
राहुल गांधींनी भोपाळमधील एका सभेमध्ये भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामावर भाष्य केले. ट्रम्प यांनी फोन केला आणि नरेंद्रजींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास साक्षी आहे, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे चरित्र आहे, ते नेहमीच झुकतात. पण अमेरिकेच्या धमकीला न जुमानता भारताने 1971 मध्ये पाकचे तुकडे केले होते. काँग्रेसचे नेते, नेत्या महासत्तांशी लढतात, त्यांच्यासमोर कधीही झुकत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला एक काळ माहिती असेल जेव्हा फोन नाही तर सातवे आरमार आले होते. मात्र तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचे आहे ते मी करेन. हाच दोघांमधील फरक आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बोचरी टीका केली. आज देशामध्ये विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष आणि राज्यघटना आहे, तर दुसरीकडे भाजप आणि संघ आहे जो या राज्यघटनेला संपवू इच्छित आहे. देशातील सर्व घटनात्मक संस्था भाजप आणि संघाच्या नियंत्रणाखाली गेल्या आहेत. त्यांनी सर्व संस्थांमध्ये आपल्या विचारांची माणसे बसवली आहेत, असा आरोप त्यांनी केला.