यापुढे सर्व वाहतूक नियमभंगांसाठी एआय यंत्रणेद्वारे चलन

0
4

वाहतूक नियम उल्लंघनासाठी दंडाचे चलन जारी करण्यात येणाऱ्या इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या (एआय) माध्यमातून विना हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, मोबाईल वापर, वाहनांच्या काळ्या काचा, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी आदी वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी सुद्धा दंडाचे चलन जारी करण्याची तरतूद केली जाणार आहे. सध्याच्या घडीला सिग्नल तोडणे आणि अतिवेग यासाठीच एआयद्वारे चलन जारी होत आहे.

पणजी महानगरपालिका आणि परिसरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर गेल्या चार महिन्यांपासून दंडात्मक कारवाईसाठी एआय तंत्रज्ञाचा वापर केला जात आहे. सध्या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केवळ सिग्नल तोडणे आणि वेगाने वाहन हाकणाऱ्यांना चलन जारी केले जात आहे. आत्तापर्यंत हजारो वाहनचालकांना या माध्यमातून दंड ठोठावून कोट्यवधींचा महसूल गोळा केला आहे.
वाहतूक खात्याने आता एआयच्या माध्यमातून होणाऱ्या दंडात्मक कारवाईमध्ये आणखी सुधारणा करून व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या एआय यंत्रणेमध्ये अनेक वाहतूक नियमांच्या उल्लंघनांचा समावेश केला जाणार आहे. त्यात दुचाकीवरून विना हेल्मेट प्रवास, दुचाकीवरून तीन किंवा अधिक जणांचा प्रवास, कारमध्ये सीट बेल्ट न वापरणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर, कारच्या काळ्या काचा, अयोग्य वाहनक्रमांक पट्टी आदी वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना चलन देण्याची तरतूद केली जाणार आहे.