मुख्यमंत्र्यांची माहिती : येत्या वर्षापासून अनेक नवे शैक्षणिक उपक्रम
पुढच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे टॅब आणि लॅपटॉप यामध्ये पॉर्न संकेतस्थळ ब्लॉक करण्यात येणार असून शिक्षणासाठी उपयुक्त असलेले एक विशेष सॉफ्टवेअर घालण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.
पुढच्या वर्षात सरकारतर्फे रोबोटिक ट्रेनिंग, प्राथमिक स्तरावर लहान मुलांसाठी बालकथा, विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येणार आहेत त्याचबरोबर नवीन शिक्षकांची शिक्षण खात्यातर्फे नेमणूक करतांना जे शिक्षक शिक्षणाला जास्त महत्व देतील त्यांनाच सामावून घेतले जाईल. शिक्षकांचे वेतनाला दुय्यम स्थान दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
कवळे फोंडा येथील श्री शांतादुर्गा शिक्षण समितीच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या समारोप समारंभावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्मानीय अतिथी म्हणून दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शांतादुर्गा शिक्षण समिती सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर, शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, श्री शांतादुर्गा शिक्षण समितीचे अध्यक्ष कुमार सरज्योतिषी उपस्थित होते.
शिक्षण हे देशासाठी समर्पित असले पाहिजे. समर्पित विचार मनात ठेवला पाहिजे. त्याचबरोबर समाजाचे योगदानही तेवढेच महत्वाचे आहे असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी सांगितले. शिक्षण हा विशेष विषय नसून तो समाजाचा एक भाग आहे असे नरेंद्र सावईकर यांनी यावेळी सांगितले.
सकाळच्या सत्रात शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर सत्र झाले. यात एमकेसीएलचे विवेक सावंत आणि गोवा विद्यापीठाचे रामराव वाघ यांनी आपली मते मांडली. दुपारच्या सत्रात उद्योजकतासाठी शिक्षण या विषयावर सत्र झाले. यात उद्योजक श्रीनिवास धेंपो, ज्ञानप्रबोधिनी पुण्याचे आदित्य शिंदे यांनी आपली मत मांडली. तसेच सायंकाळच्या सत्रात शालेय शिक्षणाची गुणवत्ता क्षमता यावर ए. एस. चंद्रशेखरन आणि अनिल खेर यांनी मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दी उपाध्ये यांनी केले.
जीडीपीचा विकास शिक्षणावर अवलंबून : डॉ. काकोडकर
जीडीपीचा विकास शिक्षणावर अवलंबून आहे. जीडीपीमध्ये पैशांची गुंतवणूक केली तर त्याचा विकास पक्का आहे. तंत्रज्ञानाचा शक्तीची ओळख पटणे आवश्यक आहे. मनावर ठसवणारे कौशल्य शिक्षणात असले पाहिजे. शाळा, विद्यालय, महाविद्यालयात कौशल्य हे शिक्षणाचा अंतर्भाग असणे आवश्यक आहे असे डॉ. अनिल काकोडकर यावेळी बोलताना म्हणाले.
शिक्षण व संशोधन पध्दती यांचा अभाव असल्याने शिक्षणाकडे एक योजनाबध्द कार्य म्हणून पाहणे गरजेचे आहे. नवीन ज्ञान, तंत्रज्ञानाभिमुख होणे आवश्यक आहे. देशात नवनवीन तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानामुळे समाज आत्मनिर्भर बनत आहे. तंत्रज्ञान हे वाईट नाही वाईट आहे ती माणसांची विचारशक्ती. तंत्रज्ञानाचा फायदा करून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपण दुसर्यावर अवलंबून न राहणे योग्य आहे असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
विद्यार्थ्यांकडून मिळणार्या योगदानाबद्दल कुतूहल बाळगणे आवश्यक आहे. उत्तम शिक्षणासाठी विद्यालयात विविध विकास कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.