याचसाठी केला होता अट्टाहास!

0
433

– मोहन रानडे
पोर्तुगीज जोखडातून गोवा मुक्त झाल्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली. गोवा मुक्त होत असल्याची सुवार्ता मला मोठ्या नाट्यमयरीत्या समजली. मी त्यावेळी लिस्बनजवळील एका जुनाट किल्ल्यात २६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगत होतो.
१९ डिसेंबर १९६१ हा दिवस नेहमीप्रमाणे उगवला, परंतु पहारेकर्‍याने कैदी मोजण्यासाठी सकाळी दार उघडले तेव्हाच वातावरणात अनोखा तणाव जाणवला. ‘बॉं दीय’(सुप्रभात) म्हणण्याची नेहमीची औपचारिकता त्याने आज दाखवली नाही. जरासा गुर्मीतच वाटला. थोड्या वेळाने मला केसकापणीसाठी बाहेर काढण्यात आले तेव्हा तर तणाव अधिकच जाणवला. न्हाव्याच्या पोशाखात असलेल्या शिपायानेही ‘बॉं दीय’म्हटले नाही. एरवी तोंडाची टकळी चालविणारा तो आज संपूर्ण केसकापणी होईपर्यंत गप्प होता.कसल्या तणावाखाली ही सर्व मंडळी आज दबून गेली असावी याचा उलगडा जेव्हा पहारेकर्‍याने मला कोठडीत ढकलून धाडकन दार बंद करून घेतले, तेव्हा झाला. कोठडीतील माझे पोर्तुगीज व आफ्रिकन सहकारी माझी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. कोठडीत माझे पाऊल पडण्याचा अवकाश; माझ्यावर आलिंगनांचा आणि अभिनंदनांचा वर्षाव होऊ लागला. माझ्या मनाचा उडालेला गोंधळ त्यांना फार वेळ पाहवला नाही. त्यांनी नुकतेच आलेले लिस्बनचे दैनिक ‘उ सॅकुलु’माझ्यापुढे धरले आणि काय आश्‍चर्य…! भारतीय सैन्याने गोव्यावर आक्रमण केल्याची बातमी अगदी पहिल्या पानावर ठळक अक्षरांत छापलेली. पोर्तुगीज सैन्य इंच-इंच भूमी लढवत असल्याची वल्गनाही त्यात होती; पण फक्त वल्गनाच! पोर्तुगीज सैन्याचा पाडाव व गोव्याची मुक्तता ही आता काळ्या दगडावरची रेघ होती. फक्त काही तासांचाच काय तो अवकाश होता.
ङ्गडींेपश ुरश्रश्री वे पेीं र िीळीेप ारज्ञश, पेी ळीेप लरीी र लरसशफ या काव्यपंक्तीचा प्रत्यय मला त्या दिवशी पुनश्‍च आला. त्या कशीयश किल्ल्याच्या जाडजूड दगडी भिंती आणि कोठडीच्या खिडकीचे मजबूत लोखंडी गज पार करून माझे मन केव्हाच गोव्यात पोचले होते आणि स्वातंत्र्याचे स्वागत करणार्‍या माझ्या सहकार्‍यांत सामील झाले होते. यांच्याचबरोबर मी ते स्वातंत्र्यसंग्रामाचे मंतरलेले दिवस जगलो होतो, यांच्याचबरोबर आणाभाका घेतल्या होत्या, बेभान होऊन काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग तुडवला होता, शत्रूशी निकराने लढलो होतो; आणि लढ्याच्या ओघात परस्परांपासून विखुरलोही होतो. कोणी वीरमरण प्राप्त झाल्याने, तर कोणी घायाळ होऊन शत्रूच्या हाती पडल्याने. माझे मन आणखी किती वेळ त्यांच्याशी बोलण्यात मग्न राहिले असते कोण जाणे… पण पहारेकर्‍याच्या ‘ए रांगेत उभे राहता येत नाही का?’ या दटावणीने मी भानावर आलो. कैद्यांना मोजण्याची वेळ झाली होती आणि मी रांगेत उभा नव्हतो. तुरुंगाधिकारी आत आल्यावर एरव्ही एक उपचार म्हणून ‘बॉं दीय’ म्हणणार्‍या आम्ही त्या दिवशी मात्र त्यांना अगदी मनापासून ङ्गबॉं दीयफ म्हटले. ते मात्र गप्पच राहिले. खरेच आजचा दिवस त्यांच्या दृष्टीने अशुभ होता. त्यांच्या साम्राज्याचा एक भाग आज निखळून पडला होता, मुक्त झाला होता, आणि तोही चारशे पन्नास वर्षांनी. माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा दिवस त्यांच्या दृष्टीने काळा दिवस ठरला होता.
मी भारतीय असल्याने माझ्या आनंदाला साहजिकच परिसीमा नव्हती. पण माझ्या पोर्तुगीज व आफ्रिकन सहबंद्यांनाही माझ्याएवढाच आनंद झाला होता. गोव्याच्या स्वातंत्र्यात त्यांनाही आपल्या मुक्तीची बिजे दिसत होती. पोर्तुगीज सहबंदी उत्सुक होते लोकशाही स्वातंत्र्यासाठी आणि आफ्रिकन सहबंदी उत्सुक होते त्यांच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी. आपला एक-एक जवान दहा-दहा भारतीयांना व वीस-वीस आफ्रिकनांना भारी असून आपली सेना अजिंक्य आहे अशी शेखी पोर्तुगालचा हुकूमशहा मिरवत असे. गोवामुक्तीने त्याची ही घमेंड आज धुळीस मिळाली होती.
माझ्या सहकार्‍यांना स्फुरण चढले होते. स्वातंत्र्य दृष्टिपथात आल्यासारखे त्यांना वाटू लागले होते. साहजिकच तेही माझ्या आनंदात सहभागी झाले होते. सात कैद्यांसाठी बांधलेल्या या कोठडीत आम्ही चक्क सोळाजण होतो. परंतु त्या दिवशी आम्हाला गुदमरल्यासारखे झाले नाही की जीव घुसमटला नाही. मुक्ततेच्या कल्पनेने आम्हाला बेहोष केले होते. जसा जमेल तसा तो दिवस आम्ही साजरा केला. तुरुंगाच्या शिस्तीची पर्वा न करता.
माझा पहिला गोवा मुक्तिदिन १९ डिसेंबर १९६१ रोजी वरीलप्रमाणे गजांआड का होईना, साजरा झाला. पुढे आठ वर्षांनी माझी सुटका होऊन मी गोव्यात परत आलो सगळेच काही बदलून गेलेले होते. एका मोठ्या निद्रेतून जागे व्हावे तसे माझे झालेले होते.
गोव्यातील ओबडधोबड मातीच्या रस्त्यांनी डांबरी रूप धारण केले होते. ज्या खेडेगावात- सावईत- विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदान करून आम्ही झोपडीवजा शाळा १९५२ साली उभी केली होती, तिची जागा आता प्रशस्त पक्क्या इमारतीने घेतली होती. एक नव्हे, दोन शाळा दिमाखात मिरवत होत्या. सगळे गोवेच बदलले होते. अगदी यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे! गोव्यातील मुलांना आता शिक्षणासाठी गोव्याबाहेर वणवण भटकावे लागणार नव्हते. महान होण्यासाठी गोमंतकीयांना आता गोवा सोडावा लागणार नव्हता. शतकानुशतके उपेक्षितांचे जीवन कंठणारे आता ताठ मानेने हिंडताना मला दिसत होते. स्वातंत्र्याने सर्व चित्रच पालटून टाकले होते. अशा या उत्साहदायी वातावरणात आज मी गोवा मुक्तिदिन साजरा करीत होतो. आठ वर्षांपूर्वी तो साजरा केला होता खरा, पण गजांआड. जे निशाण फडकविल्याच्या गुन्ह्याबद्दल देशभक्तांना बेदम मारहाण करण्यात येत असे, प्रसंगी गोळ्याही घालण्यात येत असत, तेच निशाण आज मोठ्या दिमाखात चढविले जात होते. ‘जय हिंद’ची घोषणा देणे हाही पोर्तुगीज राजवटीत दंडनीय अपराध असे. आज तीच गर्जना सहस्रावधी कंठातून निनादत होती…
मला धन्य वाटले, कृतार्थ वाटले. ‘‘याचसाठी केला होता अट्टाहास| शेवटचा दिवस गोड व्हावा॥