सनबर्न संगीत महोत्सव दरवर्षीप्रमाणेच यंदाही वादाची वावटळ घेऊन आला आहे. महोत्सवाचे हे अठरावे वर्ष जरी असले, तरी हा महोत्सव आणि वाद हे जणू एक समीकरणच होऊन बसले आहे. ज्या ठिकाणी यंदा ह्या महोत्सवाच्या आयोजकांनी त्याचे बस्तान हलवले आहे, त्या धारगळमध्ये स्थानिक नागरिक त्याविरुद्ध आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी देखील नागरिकांसोबत राहण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र, स्थानिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ह्या संगीत महोत्सवाच्या आयोजनाबद्दल फारच प्रेमाचे भरते आलेले दिसते. त्यामागील कारणे कोणती असावीत ह्याचा अंदाज आजवर ह्या महोत्सवाला दरवर्षी होणारा विरोध आणि नंतर बिनबोभाट मिळणाऱ्या परवानग्या ह्याचा इतिहास जरी तपासला तरी सहज येऊ शकतो. 2007 साली हा शैलेंद्र सिंग यांच्या प्रेरणेतून सनबर्न महोत्सव गोव्यात अवतरला. कांदोळीच्या किनाऱ्यावर सुरू झालेल्या ह्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक म्हणजेच ईडीएम महोत्सवाने बघता बघता प्रचंड ‘लोकप्रियता’ गाठली. उपस्थितीचे उच्चांक प्रस्थापित झाले. युवकांमधील वाढत्या संगीतप्रेमापेक्षा त्या महोत्सवाच्यानिमित्ताने होणाऱ्या नाना प्रकारच्या उलाढाली हे त्यामागील खरे कारण असावे असे बोलले गेले. खरे कारण काही असो, परंतु बघता बघता हा महोत्सव मोठा होत गेला हे मात्र खरे. नंतर कांदोळीवासीयांनी त्याबाबत तक्रार करायला सुरूवात करताच तो वागातोरला हलवण्यात आला. तेथेही तक्रारी आल्यानंतर पुन्हा जागा बदलणे आले. दरवर्षी महोत्सवाच्या आधी हा नव्या जागेचा शोध सुरू होतो. एका वर्षी तर आधीचे कोट्यवधींचे देणे आयोजकांनी न फेडल्याने सरकारने परवानगी नाकारल्याने महोत्सवाचे पुण्यात आयोजन झाले होते आणि तेथेही त्याला विरोध झाला. यंदाही वेर्णा, कामुर्ली अशा जागा शोधत शोधत धारगळमध्ये महोत्सवाचे हे गाडे आले आहे. आज हा महोत्सव आशियातील सर्वांत मोठा संगीत महोत्सव गणला जातो आणि जगामध्ये तो अकराव्या क्रमांकावर आहे, असा आयोजकांचा दावा आहे. दरवर्षी हा महोत्सव जवळ आला की त्याच्या आयोजनाची झळ बसलेले नागरिक त्याच्या विरोधात दंड थोपटतात. ह्या महोत्सवाच्या निमित्ताने लोटणारे लोंढे, त्यातून गंभीर होत जाणारा वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न, रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा होणारा त्रास, पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी, महोत्सवानंतर निर्माण होणारा केरकचरा अशी अनेक कारणे सांगत नागरिक त्याविरोधात उभे राहतात. मात्र, नागरिकांचा कडाडून विरोध होत असताना स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र महोत्सवाला सर्व त्या परवानग्या देण्यास अगदी आतुर दिसतात. ह्या पूर्वी ह्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक गैरप्रकार उजेडात आले. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे उपस्थित तरुणीच्या मृत्यूपासून सरकारचे पैसे न फेडताच पोबारा करण्यापर्यंत अनेक प्रकार झाले. गेल्या वर्षीच्या महोत्सवात ध्वनिप्रदूषणाची तक्रार अगदी न्यायालयापर्यंत गेली होती. महोत्सवात रात्री दहानंतरही संगीत वाजत होते आणि 55 डेसिबल्सच्या मर्यादेचे उल्लंघन झाले असा आक्षेप याचिकादाराने घेतला होता. उच्च न्यायालयाने त्याबाबत हणजूण पोलीस आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची खरडपट्टी काढली. ‘न्यायालयाचा आदेश पाळायचा नसेल तर निदान तुम्हीच लागू केलेल्या कायद्यांचे तरी पालन करा’ असे न्यायालयाने तेव्हा सरकारला सुनावले होते. महोत्सवासाठी आयोजकांनी भरलेली दहा लाखांची ठेव जप्त करून फौजदारी तक्रार नोंदवण्याची गर्जना प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली होती, तिचे पुढे काय झाले? पण ‘पब्लिक मेमरी इज शॉर्ट’ म्हणतात. म्हणजे जनतेची स्मरणशक्ती खूप कमी असते. त्यामुळे गतकाळात घडलेल्या गोष्टी लगेच पडद्याआड जातात. ह्या महोत्सवाच्या संदर्भातही अशाच प्रकारे जुन्या गोष्टी डोळ्यांआड सारल्या जातात आणि सरकार पर्यटनाला चालना देण्याचे कारण देत त्याला सर्व प्रकारच्या परवानग्या पुढे करीत असते. यंदा 28 ते 30 डिसेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. अजून ह्या महोत्सवाचे ठिकाण निश्चित झालेले नाही, सरकारच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत, नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत, परंतु ‘बुक माय शो’वर महोत्सवाची साडे तीन हजारांपासूनच्या तिकिटांची विक्री बिनबोभाट सुरू आहे. यंदाच्या महोत्सवात दक्षिण कोरियाचा डीजे स्क्रिलेक्स आणि पॅगी येणार असल्याची जाहिरातबाजीही चालली आहे. म्हणजेच कोणी कितीही गहजब केला, आरडाओरडा केला, तरी शेवटी सरकार आणि स्थानिक पंचायत सर्व त्या परवानग्या देणारच आहे हा दृढ विश्वास महोत्सवाच्या आयोजकांना दिसतो, ह्यातच पुढे काय होणार हे दिसते आहे.