>> मुख्यमंत्र्यांकडून नवनिर्वाचित पंच सदस्यांना सज्जड दम; स्थिर प्रशासनासाठी प्रयत्नशील
ग्रामपंचायतींतील सरपंच, उपसरपंच पदासाठी दरवर्षी सुरू असणारा संगीत खुर्चीचा खेळ यंदापासून भाजप चालू देणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कालनवनिर्वाचित पंच सदस्यांना दिला. आम्हाला स्थिर प्रशासन द्यायचे आहे. संगीत खुर्चीमुळे विकासात अडथळे येतात आणि विकासकामांना खीळ बसते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
साखळी मतदारसंघातील सहा पंचायतीत नव्याने निवडून आलेल्या पंच सदस्यांशी स्थानिक आमदार या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल संवाद साधत मार्गदर्शन केले. साखळी भाजप कार्यालयात झालेल्या या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, विश्वंभर गावस, सुभाष मळीक, प्रदीप गावडे, गुरुप्रसाद नाईक यांची उपस्थिती होती. सांखळी मतदारसंघातील पाळी, वेळगे, सुर्ल, कुडणे, न्हावेली, आमोणा या पंचायतींतून निवडून आलेल्या ४३ पंच सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.
पंच सदस्यांनी पंचायत राज्य नियम पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. आपले अधिकार काय आणि मर्यादा काय याचा अभ्यास केला पाहिजे. लवकरच निवडून आलेल्या पंच सदस्यांना खास प्रशिक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण मतदारसंघ हा आपला असून, सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला गावांचा विकास साधायचा आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांनी आपला निवडणुकीतील विरोधक हा भाजपचा विरोधक समजू नये. सगळे आपलेच आहेत. सर्वांना मिळून मिसळून गावाचा विकास साधायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नवनवीन विकासाच्या योजना आखताना पर्यावरण सांभाळून विकासाला गती द्यायची आहे. त्यामुळे पंच सदस्य, सामाजिक संस्था व लोकसहभाग देखील महत्वाचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी यंदाच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या आठ माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला. कृष्णा गावस, राजन फाळकर, रोहिदास कन्सेकार, सुभाष फोंडेकर, भोला खोडगीणकर, सर्वेश मुळगावकर, दुर्गादास नाईक, प्रशिला गावडे यांना सन्मानित करण्यात आले. नव्याने निवडून आलेल्या सर्वांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.
प्रत्येक पंचायत आत्मनिर्भर करण्यासाठी सर्व सदस्यांनी संघटित योगदान दिले पाहिजे. संगीत खुर्चीमुळे विकास प्रक्रियेत अडथळे येत असतात. त्यामुळे या प्रकाराला यापुढे कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री