म्हार्दोळात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

0
18

म्हार्दोळ परिसरात बिबट्या भरवस्तीत घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. एका घराशेजारी असलेल्या झोपडीत बिबट्या घुसला होता. बिबट्याचे दर्शन होताच वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर काहीवेळातच त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने वन विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बागवाडा-सिमेपाईण, म्हार्दोळ येथील रामदास नाईक यांच्या घराला लागून असलेल्या लाकूडसाठा केलेल्या झोपडीत बिबट्या लपून बसला होता. सकाळी रामदास नाईक देवपूजेसाठी फुले काढण्यासाठी गेले असता हा बिबट्या निवांतपणे झोपडीत बसल्याचे दिसून आल्याने त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

बिबट्याच्या मानेवर जखमा
बिबट्या आढळल्याने हा परिसर सील करण्यात आला होता. वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी जाळे व गुंगीचे इंजेक्शन यासारखे साहित्य घेऊन घटनास्थळी आले आणि त्यांनी बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याच्या मानेवर जखमा दिसल्याने त्याच्या मृत्यूचा संशय बळावला आहे. वन विभागाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.