म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या म्हापसा पालिका बाजारपेठेत चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालत एकाच वेळी पाच दुकानांना लक्ष्य केले. या चोरीमध्ये चोरट्यांनी दुकानांतील रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी म्हापसा मार्केटमधील पाच दुकानांचे टाळे तोडून आत प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने डेकोरेशन आणि डिस्पोजेबल वस्तूंची दुकाने, तसेच कपड्यांच्या दुकानांचा समावेश आहे. चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यांमधील एका आस्थापनातून रोख रक्कम आणि वस्तू मिळून लाखभर रुपयांचा मुद्देमाल चोरला, तर इतर चार दुकानांत चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, तेथून काही चोरून नेले नाही.
ज्या ठिकाणी ही चोरी झाली, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते, त्याचा फायदा घेतला; मात्र म्हापसा पोलीस आता मार्केटमधील इतर भागांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. चोरटे कोणत्या मार्गाने आले आणि पसार झाले याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणी दुकानदारांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.