म्हापसानगरीच्या विकासातील सिरसाट कुटुंबीयांचे योगदान

0
177

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

तात्या हे तसे स्वभावाने धाडसी आणि जीवनात कोणताही धोका पत्करण्याची तयार ठेवलेले. म्हणूनच कै. गोविंद व त्यांनी मिळून इ.स. १९५६ साली ‘कुवैत’ या अरब प्रदेशात ‘रॉयल ज्युवेलर्स’ हे सोन्या-चांदीचे आणि हिरे-मोती विक्रीचे आस्थापन सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी दागिने घडवणार्‍या सोनार समाजातील कलाकारांना सोन्या-चांदीचे अलंकार बनवण्यासाठी म्हापशाहून कुवैत येथे नेले होते.

पोर्तुगीजकालीन म्हापशातील सात वाड्यांपैकी ‘अन्साभाट’ व ‘तळीवाडा’ या दोन वाड्यांच्या मध्यभागी असलेला भाग म्हणजे ‘सिरसाटवाडा.’ म्हापशातील प्रसिद्ध श्री हनुमान मंदिराच्या मागील भागात हा वाडा वसलेला आहे. या वाड्यावरील सिरसाट, जोशी, मिशाळ, फळारी, नार्वेकर, पावसकर, नाईक अशी काही प्रसिद्ध कुटुंबे या वाड्यावर राहतात. सिरसाट व जोशी या दोन कुटुंबीयांची प्रशस्त अशी, ‘चौकीचा वाडा’ म्हणून ओळखली जाणारी घरे आहेत. पूर्वी ही सर्व घराणी एकत्र कुटुंबपद्धतीमुळे मुलाबाळांनी भरलेली असायची.

पुढे मग धंदा-व्यवसायानिमित्ताने घरातील कर्ती-सवरती माणसे इतरत्र स्थायिक झाली आणि एकत्र कुटुंबपद्धती मोडीत निघाली. आता ही पद्धत संपुष्टात आलेली असली तरी चतुर्थी-दिवाळीसारख्या सणासुदीला इतरत्र स्थायिक झालेली मंडळी आपल्या जुन्या घरी येतात. पूर्वजांचे हे घर सांभाळणारे कुटुंबीय त्या सर्वांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. याला आमचे सिरसाट कुटुंबीयही अपवाद नाहीत. गोवा मुक्तीनंतर दुर्दैवाने या सर्व गोष्टींना बहुतेक कुटुंबं फाटा देत असल्याचं दृश्य आपणास सर्रासपणे दिसत आहे.

आम्हाला ज्ञात असलेले सिरसाट कुटुंबातील मूळपुरुष म्हणजे कै. नागेश काशिशेट सिरसाट. त्यांना पहिल्या बायकोपासून (मथुरा) झालेली मुलं म्हणजे कै. पांडुरंग आणि कै. शंकर. पहिली पत्नी दिवंगत झाल्यावर दुसर्‍या पत्नीपासून (राधाबाई) झालेला मुलगा म्हणजे कै. दामोदर. कै. पांडुरंग यांना पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा कै. गणपत व पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसर्‍या पत्नीपासून झालेला पुत्र म्हणजे कै. दत्ताराम. कै. गणपत यांचा कै. राधाबाई पावणे हिच्याशी विवाह झाला होता व त्यांना काशिनाथ, नागेश व वसंत असे तीन मुलगे होते, तर कै. दत्ताराम यांना विजय, विमल, तानी व सरोज अशी चार मुले आहेत. कै. शंकर यांना कै. रामचंद्र हा एक मुलगा होता व त्यांचा कै. रमाबाई वेरेकर यांच्याशी विवाह झाल्यावर गोविंद, जयराम, आनंद, शंकरलाल व दामोदर (अवधूत) असे पाच मुलगे व कै. श्रीमती वळंजू, कै. प्रभावती काणेकर, सौ. महानंदा लाड व श्रीमती चंद्रा शिरोडकर अशा चार विवाहित मुली होत्या.

आज आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ म्हणजे श्री. जयराम रामचंद्र सिरसाट उपाख्य ‘तात्या’ हे होत. आज त्यांनी वयाची ९४ वर्षे पूर्ण करून ९५ व्या वर्षाकडे वाटचाल सुरू केली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांमध्ये पूर्वी ते ज्या उत्साहाने वावरत असत त्याच उत्साहाने आणि हिरिरीने आजही कार्यरत असतात हे त्यांच्या साफल्यपूर्ण जीवनाचे उदाहरण आहे असे मला वाटते.
तात्यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९२३ रोजी कोकणातील सावंतवाडी येथे झाला. त्यांचे शिक्षण तत्कालिन इंग्रजी मॅट्रिकपर्यंत झाले आहे. तत्पूर्वी त्यांनी मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. वयात आल्यावर त्यांनी आपल्या वडिलांच्या कौटुंबिक व्यवसायात इतर बंधूंबरोबर लक्ष घालावयास सुरुवात केली. पणजी येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या बाजूलाच असलेल्या एका दुकानात त्यांचं हिर्‍या-मोत्यांचं आणि सोन्या-चांदीचे दागिने विकण्याचं ‘सिरसाट ज्युवेलर्स’ हे आस्थापन आहे. तात्या हे तसे स्वभावाने धाडसी आणि जीवनात कोणताही धोका पत्करण्याची तयार ठेवलेले. म्हणूनच कै. गोविंद व त्यांनी मिळून इ.स. १९५६ साली ‘कुवैत’ या अरब प्रदेशात ‘रॉयल ज्युवेलर्स’ हे सोन्या-चांदीचे आणि हिरे-मोती विक्रीचे आस्थापन सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी दागिने घडवणार्‍या सोनार समाजातील कलाकारांना सोन्या-चांदीचे अलंकार बनवण्यासाठी म्हापशाहून कुवैत येथे नेले होते. नंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू कै. गोविंद यांना त्यांनी कुवैतला नेले होते.

तत्पूर्वी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यसेनानी आणि गोवा मुक्तिलढ्याचे प्रणेते कै. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या प्रेरणेने त्यांनी या लढ्यात उडी घेतली होती. कै. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या अनेक भूमिगत बैठकांना ते हजर राहत असत. बार्देस तालुक्यातील पर्रा येथील कै. काशिनाथ सिरसाट व म्हापशातील आंगडवाडा येथे वास्तव्यास असलेले कै. अंताजी लाड यांच्या निवासस्थानी झालेल्या त्यांच्या बैठकांना आपण उपस्थित राहिलो होतो याची आठवण तात्या आजही सांगतात.

पुढे ते स्वा.सै. कै. आपा करमळकर यांच्या नेतृत्वाखालील गटात इ.स. १९५६ साली दाखल झाले. त्यावेळी आपा करमळकर हे सावंतवाडी तालुक्यातील बांदा गावी असलेल्या नॅशनल गोवा कॉंग्रेसच्या मुख्यालयातून भूमिगत कारवाया करण्यात सक्रिय होते. तात्या त्यांच्या गटात सामील झाल्यावर गोव्यात राहून भूमिगत कार्य करायचे. संदेशवाहक केबल्स कापणे, पोर्तुगीज सैनिकांचा आणि पोलीस ठाण्याचा ठावठिकाणा देणारी छायाचित्रे काढून ती सारी माहिती आपा करमळकर यांना पुरवीत होते.

त्यानंतर तात्या स्वा.सै. आणि गोवा मुक्तिलढ्यातील एक अग्रणी कै. विश्‍वनाथ लवंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘आझाद गोमंतक दल’ या लढाऊ संघटनेत दाखल झाले. त्यावेळी कै. लवंदे यांचे मुख्यालय बेळगाव येथे होते आणि सावंतवाडी, बांदा आदी सीमाभागातील ठाण्यांंवरून त्यांच्या कारवाया चालत असत. पोर्तुगीज सैन्याच्या हालचालींची इत्थंभूत माहिती तात्या त्यांना पुरवीत असत. त्याचवेळी कै. वसंत व कै. वामन आत्माराम नाईक (पेडणेकर) हे व्यापारी बंधुद्वय कै. महाबळेश्‍वर डांगी यांच्या बरोबरीने आझाद गोमंतक दलाच्या कार्यासाठी देणग्या गोळा करण्याचे काम करायचे. त्यांच्या या कारवायांचा पोर्तुगीज सैनिकांना सुगावा लागताच साधारणतः मार्च १९५६ मध्ये स्वा.सै. कै. पांडुरंग नीळकंठ कवळेकर, कै. वसंत नाईक (पेडणेकर), कै. वामन नाईक (पेडणेकर), श्री. काशिनाथ सारंगधर नाटेकर यांच्याबरोबरीने तात्यांनाही तत्कालिन पोर्तुगीज क्रूर गुप्तचर कास्मिरो मोंतेरो याने १९५६ साली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटक करून पेडणे तालुक्यातील नागझर येथील राजबंद्यांच्या छावणीत ठेवले होते. तेथे सुरुवातीचे चारपाच दिवस त्यांना बरीच मारहाण करून त्यांचा शारीरिक छळ केला होता. ‘आझाद गोमंतक दला’च्या कारवाया आणि योजना आणि त्यात गुंतलेल्यांची माहिती त्यांच्याकडून मिळवावी या हेतूने क्रूरकर्मा कास्मिरो मोंतेरो यांनी ही मारहाण घडवून आणली होती. एका आठवड्यानंतर त्यांची पणजी येथील पोलीस ठाण्यावरील तुरुंगात रवानगी करण्यात आली. येथेही त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.
सात महिन्यांच्या तुरुंगवासाने ऑक्टोबर १९५६ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतरही त्यांना चौकशीसाठी मोंतेरो पणजी पोलिस चौकीवर बोलावून न्यायचा. पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून गोवा मुक्त होईपर्यंत त्यांचे भूमिगत कार्य सुरूच होते. याच दरम्यान धुळेर- म्हापसा येथील स्वा.सै. कै. कान्होबा यशवंत नाईक, जे सावंतवाडीहून मुक्तिलढ्यात भूमिगत कार्य करीत होते आणि भूमिगत कार्यासाठी गोव्याला वारंवार भेट देत होते, त्यांना स्वतःच्या चारचाकी वाहनातून हातबॉम्ब आणि स्फोटके यांसह दहशतवादी कारवायांसाठी बरोबर घेऊन तात्या फिरत होते. राज्यसरकारने गोवा मुक्तिदिनी त्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरवही केला आहे. हल्लीच म्हापसा नगरपालिकेने १५ ऑगस्ट २०१७ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार केला होता.

पोर्तुगीज काळात म्हापसा शहराचा कारभार ‘काम्र मुनिसिपाल दी बार्देस’ ही स्वराज्यसंस्था पाहत होती. गोमंतक मुक्तीनंतर या संस्थेचे ‘म्हापसा नगरपालिका’ असे नामकरण करण्यात आले. सुरुवातीला सरकारनियुक्त नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील पालिका मंडळ शहराचा कारभार सांभाळत होते. त्यानंतर ६ ऑक्टोबर १९७० रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वानुमते तात्यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. लोकशाही पद्धतीने निवडणूक झाल्यावर नगराध्यक्षपदाचा मान मिळवणारे तात्या हे पहिले नगराध्यक्ष होत.
तात्यानी व्यवसायानिमित्ताने बराच परदेशप्रवास केलेला असला तरी हल्लीच ते आपला तृतीय पुत्र किशोर व त्याच्या कुटुंबीयांसमवेत या वयातही मोठ्या उत्साहाने आणि उमेदीने युरोपचा दौरा करून नुकतेच परतले आहेत.

तात्या फार उच्चशिक्षित नसले तरी त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. अफाट वाचनामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले आहे. म्हापसा- दत्तवाडी येथील श्री दत्तात्रेय देवस्थान आणि पेडणे-हरमल-पालये येथील आमचे कुलदैवत ‘श्री महालक्ष्मी (सिरसाट) कुलदेवता संस्थान’च्या न्यासाची घटना तयार करून सरकारदरबारी त्यांची नोंदणी करून घेण्याचं महत्त्वपूर्ण कार्य तात्यांनी केलं आहे. म्हापशातील श्री महारुद्र देवस्थानचे आमचे कुटुंबीय महाजन असून श्रावण महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार सिरसाट कुटुंबीयांतर्फे साजरा केला जातो. शिवाय श्री दत्तात्रेय मंदिरात दुसरा श्रावणी गुरुवार होतो. श्री दत्तात्रेय देवस्थानचे कोशाध्यक्ष म्हणूनही ते बराच काळ कार्यरत होते. श्री महारुद्र देवस्थानच्या रामनवमीनिमित्त साजर्‍या होणार्‍या श्री हनुमान जयंत्युत्सवात श्री महारुद्र प्रासादिक संगीत नाटक मंडळीतर्फे जो सहा दिवसांचा नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो, या सर्व महोत्सवांत पहिल्या दिवशी होणार्‍या गणेशस्वनापासून सहाव्या दिवशी होणार्‍या गवळणकाल्यापर्यंत रोज तात्या हार्मोनिअमवर साथ देत असतात. आजवर त्यात कधी खंड पडलेला नाही. पूर्वी तात्या नाटकातून आणि गवळणकाल्यातूनही भूमिका वठवायचे. पायपेटी वाजवण्यात तर तात्या तज्ज्ञ आहेत.
म्हापसा पालिका बाजारपेठेकडील हमरस्त्याच्या डाव्या बाजूला सिरसाट कुटुंबीयांचा एक भव्य असा व्यापारी प्रकल्प उभा आहे. या प्रकल्पात डॉक्टर्स, टेलर्स, हॉटेल्स, फार्मसी, लॉज, ‘कै. रमाबाई सिरसाट हॉल’ अशी आस्थापने आहेत. अत्यंत माफक शुल्क घेऊन सदर सभागृह लग्नकाळी, वाढदिवस आदी कार्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतो. हा व्यापारी प्रकल्प उभा राहण्यामागे तात्यांचे परिश्रम, कष्ट आणि कल्पकता कारणीभूत आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. ‘सिरसाट बिल्डिंग’ या नावाने हा प्रकल्प सर्वपरिचित असून तो मध्यवर्ती ठिकाणी टॅक्सी तथा बसस्थानक आणि म्हापसा बाजारपेठ यांच्या नजीक असल्यामुळे तो प्रकल्प गोव्यात आणि गोव्याबाहेर प्रसिद्ध आहे.