‘कॉमन मॅन’

0
90

– गौरेश रा. जाधव (सावंतवाडी-ओटवणे)

‘कॉमन मॅन’ नावाचं पात्र या जीवनाच्या रंगमंचावर एक बिन आधारी भूमिका रंगवण्याचा निष्फळ प्रयत्न करित आहे. कुणास ठाऊक याची ही भूमिका किती दूरपर्यंत चालेल की मध्येच नाईलाजास्तव पडदा ओढून याला ही भूमिका संपवावी लागेल…???

‘तो’ म्हटलं तर उखळता तप्त लाव्हा आहे आणि धाक दाखवून ठेवलं तर पाणी ओतून राखेत लाचार होऊन निपचीत पडलेला निखारा आहे. त्याला मन आहे, भावना आहेत तरी पण ज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे त्याच्यासाठी मात्र त्याच्या भावना शून्य आहेत. स्वत:च्या कुटुंबाच्या सुखासाठी तो रात्रंदिवस झगडतोय. पण कोणी त्याच्या घामाला रक्त न समजता पाण्यासमान मोल देतोय. त्याचा स्वभाव कधी दगडासारखा कठोर तर कधी मधाळ. संघर्ष जीवनाचा करता करता कधी हारत नाही. रडला तरी दु:खाचे थेंब पापण्यांवरही येऊ देत नाही. कधीकाळी जीवन प्रवासात लढाया गाजवणारा तो आता त्याचं रूप बदलत चाललंय.. वादळाशी दोन हाथ करुन कधी पहाडालाही झुकवणारा हा… आजची परिस्थिती फार वेगळी आणि विदारक झालीय. या काळाच्या घोंघावत्या वादळात त्याचं जीवन सापडून तो कुठेतरी दूर फेकला जातो आहे.

सगळ्या भोवर्‍यात अडकलाय तो… परिस्थितीचा भोवरा..! एखाद्या भुकेलेल्या गिधाडाप्रमाणे त्याच्या भोवती घिरट्या घालत आहे आणि त्याच्या भाव-स्वप्नांची मात्र चीरफाड़ करत लचके तोडत आहे. त्याचं विव्हळणं सहसा कोणाला दिसत नाही आणि दिसलंच तर आपलेच त्याचा आनंद लुटत आहेत. त्याच्यासाठी आपलेच घरभेदी झाले आहेत आणि यामुळेच त्याचे हात-पाय बधिर झाले आहेत. बुद्धीला जंग चढत चालला आहे कारण त्याला स्वातंत्र्यच नाही स्वत:चे विचार मांडण्याचे… त्याला विभागलं जातं आहे जाती जमातीच्या नावावर आणि उभं केलं जातंय वेगवेगळ्या रंगांचे झेंडे देवून. घर आलं पडायला तरी त्याची त्याला कल्पना पण दिली जात नाही. त्याचा फक्त वापर करुन घेतला जात आहे स्वार्थी लोकांकडून. त्याच्या जखमा उघड्याच ठेवल्या जातायत पैसा नावाच्या मलमाचं आमिष दाखवून! आणि त्याची बुद्धी गहाण ठेवली जाते आहे.

सगळी बंधने नियम त्याच्यावर लागू होतात पण नियम करणार्‍यासाठी ते नसतात. माणूस असला तरी त्याला गाढवापेक्षा पण बदतर जीवन जगावं लागत आहे. बैलाप्रमाणे त्याला घाण्याला जुंपलं जात आहे. त्याने फक्त तेल काढावं आणि शेवटी उरलेला चोथा त्याला मिळतोय.. वयाची पासष्टी गाठल्यावरही त्याला सुख नाही. सरकारी कचेर्‍यांच्या फेर्‍या पेन्शनसाठी घालायला त्याची घालमेल होते. सरकारी धोरण आणि बदल हे त्याच्या तरुण वयातही त्याला म्हतारपणाचा अनुभव आणून देतायत. तो थकतोय आणि मग जीव नकोसा करु पाहतोय. रोजच्या दगदगीला कंटाळून त्याला समजत नाही… एका नटसम्राटाप्रमाणे त्यालाही प्रश्न पडतोय – जगावं की मरावं?.

आयुष्य सुंदरपणे जगण्याची स्वप्न उरी बाळगून येणारी संकटे तसेच कपाळमोक्ष होईल एवढ्या दाह देणार्‍या कळा सोसत, जीवनक्रम तसेच संसाराचा गाडा हाकणार्‍या याला कधी कुठच्या वळणावर विसावा घ्यावा.. अस वाटतंय पण थांबणं त्याच्या नियमावलीत बसत नाही. कारण त्याला काळजी असते ती उद्याच्या उगवणार्‍या दिवसात माझ्या मुलांच्या ताटात काय वाढलेलं असेल… हा विचार त्याला कधी स्वस्थ बसू देत नाही. किंबहुना होणार्‍या कळादेखील या विचारापुढेे नतमस्तक होतात. सामान्य म्हणून जगत असताना हे ‘कॉमन मॅन’ नावाचं घोंगावतं वादळ सिस्टीमच्या भिंतीवर आदळून थोडा वेग मंदावलेला दिसत आहे..!

अलिकडच्या काळात याचा जीवनक्रम बदलून गेला आहे. गर्दी तर वाढत आहे पण तो मात्र मनातून एकटा पडलेला आहे. दिशाहीन झाल्याप्रमाणे तो समाजात भरकटतच चालला आहे आणि त्याच्या या पांगळेपणाचा फायदा चौका चौकात घेतला जातो. होणार्‍या अन्यायाचा बदला तो नाही घेऊ शकत कारण कधी डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देणारी न्यायदेवता त्याच्यासाठी मात्र डोळे उघडून पण त्याला न्याय देऊ शकत नाही. कोणाकडे न्याय मागावा! अन् होणारी ही घालमेल, तळमळ, फरफट कोणाला दिसत नाही. त्याच्या किंकाळ्या कोणाच्याच कानापर्यंत पोहचत नाही. आणि पोहचल्याच तरी त्या हृदयापर्यंत पोहचतच नाही. यात मात्र कॉमन मॅन नावाचं पात्र या जीवनाच्या रंगमंचावर एक बिन आधारी भूमिका रंगवण्याचा एक प्रयत्न करित आहे. कुणास ठाऊक याची ही भूमिका किती दूरपर्यंत चालेल की मध्येच नाईलाजास्तव पडदा ओढून याला ही भूमिका संपवावी लागेल…???