म्हापशातील भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार

0
133

तार-म्हापसा येथील हमरस्त्यावर सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने समोरून येणार्‍या होंडा ऍक्टीव्हा स्कूटरला जोरदार ठोकर दिल्याने दुचाकीवरील दोघेही स्वार जागीच ठार झाले. ठार झालेल्यांत सर्वेश भिकू कुडव (३६, शेळ-बस्तोडा) तर विवेक दयानंद डिचोलकर (२६, कुडचवाडा-रेवोडा) याचा समावेश आहे. कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक प्रमोद रामनाथ सावंत (तळेवाडा-रेवोडा) याला म्हापसा पोलिसांनी अटक केली. म्हापसा पोलिसांनी या अपघातासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार जीए- ०१ यू- ५५१० हा खडी वाहून कोलवाळ ते पेडे मार्गे पणजीकडे जाणारा ट्रक भरधाव वेगाने जात असताना पणजीहून कोलवाळकडे जाणारी जीए- ०३ एए- ३३२२ ही होंडा ऍक्टीव्हा स्कूटर ट्रकच्या समोरून येत असताना ट्रकने त्या स्कूटरला जोरदार धडक दिली.
ही स्कूटर विवेक डिचोलकर चालवत होता तर सर्वेश कुडव हा त्याच्यामागे बसला होता. या ट्र्रकची धडक बसताच सर्वेश हा रस्त्यावर लांब फेकला गेला व गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर सर्वेश ट्रक खाली अडकून ठार झाला. हा अपघात एवढा जोरदार होता की ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या पाईप लाईनला जाऊन अडकला. त्यामुळे येथे लोकांचा जमाव जमला. अपघात होताच ट्रक चालकाने तेथून पळ काढला.