>> उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्नी चर्चेसाठी उच्चस्तरीय बैठक काल घेतली. या बैठकीत सरकारच्या म्हादई प्रकरणी आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हादई प्रश्नी निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात म्हादई लवादाच्या निवाड्याला स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
म्हादईवर सहा बंधारे बांधणार
म्हादई नदीच्या पाण्याचा वापर करण्यासाठी ६ बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून बंधारे बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. म्हादईच्या प्रश्नावर प्रसंगी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विरोधात जाण्याची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
म्हादई लवादाच्या आदेशाला स्थगिती मिळविण्यावर भर दिला जाणार आहे. लवादाने कर्नाटकला दिलेले पाणी कमी करण्यासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
म्हादईसाठी विधानसभेचे खास अधिवेशन घेण्याची गरज नाही, असे सांगून कामत यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी खास अधिवेशनाची मागणी धुडकावून लावली.
मुख्यमंत्री म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे हित जोपासण्याच्या मुद्यांवर ठाम आहे. म्हादईच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागण्याच्या मागणीचा निषेध करीत आहे, असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.