म्हादई प्रश्‍नावरून आज उत्तर कर्नाटक बंद

0
132

म्हादईच्या पाणी प्रश्‍नावरून उत्तर कर्नाटकातील गदग, धारवाड, बागलकोट व हुबळ्ळी या चार जिल्ह्यांमध्ये आज बुधवारी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाने धारवाड – हुबळी भागातील प्रवासी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने कदंब महामंडळाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली येथे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कर्नाटकातील भाजपचे अध्यक्ष येडियुरप्पा यांच्या संयुक्त बैठकीत म्हादई प्रश्‍नावर चर्चा करून कर्नाटकाला पिण्यासाठी ७.५६ टीएमसी पाणी देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पिण्यासाठी पाणी देण्याची तयारी जाहीर करून द्विपक्षीय चर्चेची तयारी दर्शविणारे पत्र भाजपचे नेते येडियुरप्पा यांना दिले होते. यामुळे म्हादई पाणी वाटप प्रश्‍नावरून गोवा व कर्नाटकातील वातावरण ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पत्राला गोव्यातील राजकीय पक्ष, स्वयंसेवी संघटनांकडून विरोध होत आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाणी प्रश्‍नी चर्चेची तयारी दर्शविण्यात आल्याने पाणी तंट्याला राजकीय वळण मिळाले आहे. कर्नाटकातील उत्तर दुष्काळग्रस्त भागात त्वरित पाणी देण्याच्या मागणीसाठी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हादई कळसा – भांडुरा नाला समितीतर्फे बंदची हाक देण्यात आली आहे.

राजकीय पक्ष पाणी प्रश्‍नाचे राजकारणासाठी भांडवल करीत आहेत, असा आरोप समितीकडून केला जात आहे. उत्तर कर्नाटकातील गदग, धारवाड, बागलकोट, हुबळ्ळी, बैंलहोंगल व आसपासच्या भागात बंद पाळण्यात येणार आहे. हुबळी येथे निषेध रॅली काढण्यात येणार आहे. भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर म्हादई पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी जलद गतीने पाऊले उचलण्याचे ठरविले आहे. भाजपच्या दोन्ही राज्यांतील नेत्यांची पाणीवाटप प्रश्‍नावर चर्चेसाठी दुसरी बैठक ५ जानेवारीला घेतली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने ही बैठक होणार नसल्याचे म्हटले आहे.

पाणी वळवण्यास विरोध : निर्मला

म्हादईच्या पाणी वळविण्याचा प्रयत्नांना विरोध केला जाणार आहे. आंदोलनाची रूपरेषा निश्‍चित केली जात आहे, असे म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्षा निर्मला सावंत यांनी सांगितले. सध्या राज्यात नाताळ सणाची धूम आहे. त्यामुळे नववर्षाच्या आरंभी अभियान आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सौ. सावंत म्हणाल्या.

पाण्यावर गोवेकरांचा हक्क : गावडे

म्हादईचे पाणी गोवेकरांना मिळाले पाहिजे, असे मत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. म्हादई नदीतील पाणी वाटपाचा प्रश्‍न लवादासमोर आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हादई पाणी वाटपाबाबत केलेल्या विधानाचा काही जणांकडून विपर्यास केला जात आहे, असा दावा मंत्री गावडे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांना पाठविलेल्या पत्रानंतर काही जणांकडून व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेची निश्‍चित दखल घेतली जाणार आहे, असा विश्‍वास मंत्री गावडे यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेसमुळे म्हादई प्रश्‍न
प्रलंबित : येडीयुरप्पा

तीन दशकांपासून प्रलंबित असलेला म्हादई पाणीतंटा सोडविण्यास कॉंग्रेसला रस नसल्याचा आरोप कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री तथा कर्नाटक भाजपचे विद्यमान भाजपाध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी काल बेंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना केला. हा प्रश्‍न झुलवत ठेवण्यास पूर्व कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या जबाबदार आहेत. ते या प्रश्‍नावर लोकांना फसवीत आहेत असा आरोप त्यांनी केला.