Home Featured म्हादई नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

म्हादई नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

0

आंघोळीवर बंदी घालण्याची मागणी

सत्तरी तालुक्यातील नद्यांमध्ये आंघोळ करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या बुडून मृत्यूच्या घटना सातत्याने घडत असल्याने या नद्या आता धोकादायक ठरत आहेत.
काल रविवारी तालुक्यातील भिरोंडा येथील पंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या नदीत गोवा वेल्हा येथील रजत काणकोणकर (21) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

गोवा वेल्हा येथील काही तरुण सत्तरी तालुक्यातील भिरोंडा येथील नदीवर आंघोळीसाठी आले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नदीत उतरण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास रजत काणकोणकर हा पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला. त्यावेळी उपस्थित स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांना पाचारण करण्यात आले. नंतर त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. वाळपई पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी पाडेली-सत्तरी येथील नदीकाठी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, काल ही घटना घडली. अशा धोकादायक ठिकाणी आंघोळीस बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

धोकादायक नदीपात्रांमध्ये आंघोळीवर बंदी घालावी, सूचना फलक लावावेत तसेच प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. पंचायतीने यासंदर्भात ठराव मंजूर करून प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशीही मागणी पुढे येत आहे.