म्हादई नदीची आजपासून तीन राज्यांत पाहणी

0
3

>> म्हादई प्रवाह समितीची 8 रोजी बैठक

केंद्र सरकारने नियुक्त केलेली प्रोग्रेसिव्ह रिव्हर अथॉरिटी फॉर वॉटर अँड हार्मनी (म्हादई प्रवाह) समिती येत्या 4 जुलै ते 7 जुलै 2024 दरम्यान म्हादई नदीची गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात पाहणी करणार आहे. येत्या 8 जुलै रोजी म्हादई प्रवाह समितीची दुसरी बैठक कर्नाटक राज्यात घेतली जाणार आहे.
कर्नाटक सरकारने म्हादई नदीवर खोदकाम सुरू केल्यानंतर गोवा सरकारच्या जलस्रोत खात्याने म्हादई प्रवाह समितीला एक पत्र पाठवून म्हादई नदीची संयुक्त पाहणी करण्याची विनंती केली होती. गोवा सरकारच्या अर्जानुसार म्हादई नदीची पाहणी केली जाणार आहे.

म्हादई प्रवाह समिती गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांत म्हादई नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास करणार आहे. म्हादई प्रवाह समितीने म्हादई नदीच्या पाहणीच्या पूर्वी घोषित केलेल्या वेळापत्रकात बदल केला आहे. आता, अगोदर गोवा राज्यातील म्हादई नदीची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात म्हादई नदीची पाहणी केली जाणार आहे. म्हादई नदीची गोव्यातील सुर्ला, अंजुणा धरण, वाळवंटी नदी, सुर्ला, गांजे, ओपा आदी भागात पाहणी करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कणकुंबी, कळसा-भांडुरा प्रकल्पासह हायड्रो प्रकल्पाची पाहणी केली जाणार आहे. म्हादई प्रवाह समितीची पहिली बैठक पणजीत झाली होती.