>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती
म्हादईच्या पाणी वाटप प्रश्नावर न्यायालयाबाहेर तोडग्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच म्हादई पाणी वाटप प्रश्नी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा एकदा स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या गोवा दौर्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. त्यांच्या दौर्याबाबत आपणाला कुणीही माहिती दिलेली नाही. तसेच त्यांच्याशी म्हादई प्रश्नी चर्चेचा कोणताही प्रस्ताव नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सरकारी खात्यातील नोकर भरतीत केवळ तातडीची पदे भरण्यास मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री, भाजप आमदारांच्या बैठकीत काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि भाजप आमदारांची बैठक आल्तिनो येथील निवासस्थानी काल घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांची उपस्थिती होती.
दर महिन्याला मंत्री, भाजप आमदारांची आढावा बैठक घेऊन विकास कामे व इतर विषयांवर चर्चा केली जाते. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामुळे बैठक घेणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आत्ता बैठक घेण्यात आली आहे. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सावंत यांनी मंत्री, आमदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच सरकारी कार्यालयातील नोकर भरतीबाबत स्पष्टीकरण केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
सरकारी कार्यालयातील नोकर भरतीबाबत आगामी पाच वर्षांसाठी पदांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे केवळ अर्जंट पदे भरली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केल्याचे कवळेकर यांनी सांगितले.
म्हादई लवादाच्या निवाड्याचा राज्य सरकारकडून आदर केला जात आहे. तरीही, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्नी खास याचिका दाखल केली आहे. न्यायालयात म्हादई प्रश्नी घेतलेल्या भूमिकेवर ठाम आहोत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.