म्हादईप्रश्‍नी आता तीव्र आंदोलन करणार

0
113

>> हृदयनाथ शिरोडकर ः मुक्तिदिनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबत दिलेले पर्यावरण दाखल्याचे पत्र त्वरित मागे न घेतल्यास येत्या गोवा मुक्तिदिनी १९ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जाब विचारला जाणार आहे. कर्नाटकला दिलेला पर्यावरण दाखला मागे घेण्यासाठी आणखीन मुदत दिली जाणार नाही. यापुढे म्हादई वाचवा गोवा वाचवा आंदोलन तीव्र केले जाणार आहे. या म्हादई बचाव आंदोलनाच्या वेळी कोणताही गंभीर, अनुचित घटना घडल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा प्रोग्रेसिव्ह फ्रंट आणि म्हादई वाचवा गोवा वाचवा या अभियानाचे निमंत्रक हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.
या पत्रकार परिषदेला म्हादई बचाव अभियानाचे प्रा. प्रजल साखरदांडे, संतोषकुमार सावंत, राजन घाटे, अभिलाष वेलिंगकर यांची उपस्थिती होती.

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पंधरा दिवसात कर्नाटकला दिलेल्या पत्राबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. तथापि, अद्यापपर्यंत कर्नाटकला दिलेल्या पत्राबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कर्नाटक सरकारकडून म्हादईचा गळा घोटण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारकडून म्हादईचा राजकीय लाभ उठविण्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप शिरोडकर यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून म्हादई प्रश्‍नी जनतेची दिशाभूल केली जात आहे. राज्य सरकारला कर्नाटकला दिलेले पर्यावरण संबंधी पत्र मागे घेण्यासाठी केंद्रीय मंत्री जावडेकर यांना स्मरणपत्र पाठवावे लागत आहे, ही मोठी दुदैवी गोष्ट आहे. केंद्रातील भाजप सरकारने कर्नाटकातील भाजप सरकार वाचविण्यासाठी गोव्याची जीवनदायिनी म्हादईचा बळी दिला आहे. याबाबत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची गरज आहे. येत्या १९ डिसेंबरला म्हादई वाचवा आंदोलन आणखीन तीव्र करून मुख्यमंत्र्यांना जाब विचाराला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हादई प्रश्‍नी ा केलेल्या घोषणा पोकळ ठरल्या आहे, असा आरोप शिरोडकर यांनी केला.

म्हादई वाचविण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे. जोपर्यत गोव्यात जनता म्हादईच्या रक्षणासाठी मोठे आंदोलन करणार नाही. तोपर्यंत केंद्रातील भाजप सरकार कोणताही निर्णय घेणार नाही. कर्नाटक सरकारपासून म्हादईला मुक्त करण्यासाठी पर्वरी येथे केलेले आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याची गरज आहे, असे पर्यावरणप्रेमी प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.

म्हादईप्रश्‍नी केंद्राला
स्मरणपत्र ः मुख्यमंत्री
केंद्राने म्हादई प्रश्‍नी कर्नाटक सरकारच्या कळसा व भंडुरा प्रकल्पाला हिरवा कंदिल देणारे जे पत्र कर्नाटक सरकारला पाठवले आहे ते मागे घेण्यात यावे, अशी जी मागणी गोवा सरकारने केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती त्याची आठवण करून देणारे एक पत्र गोवा सरकारने मंगळवारी त्यांना पाठवले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.