म्हादईप्रश्नी मोठे पथक नव्हे; तर अहवालाचा दर्जा महत्त्वाचा

0
9

>> मुख्यमंत्र्यांचे सरदेसाईंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर

गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीसंबंधीचे कोणतेही काम करायचे झाल्यास गोवा व म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय ते करण्यास कर्नाटकला परवानगी मिळणार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. म्हादईसंबंधी काम करणारे कुणाचे पथक मोठे होते, ते महत्त्वाचे नसून त्या पथकाने सादर केलेल्या अहवालाचा दर्जा कसा आहे, ते महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

म्हादई प्रवाह प्राधिकरणाने 7 जुलै रोजी बंगळुरू येथे घेतलेल्या बैठकीत कर्नाटकचे 30 सदस्यीय पथक होते, तर गोव्याचे पथक हे फक्त 3 सदस्यांचे होते, असा मुद्दा गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित करून कर्नाटकच्या 30 सदस्यीय पथकासमोर गोव्याच्या 3 सदस्यीय पथकाचा काय टिकाव लागणार, असा सवाल केला होता. त्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या पथकातही केवळ 4 सदस्य असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

म्हादईप्रश्नी गोव्याची बाजू ही कायदेशीर तसेच प्रशासकीयदृष्ट्या बळकट व्हावी, यासाठी गोवा सरकार अथकपणे प्रयत्न करीत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.