>> सुदिन ढवळीकरांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
म्हादईचे गोव्यातील अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी कर्नाटक आणि केंद्र सरकारने जर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हादई ही गोव्याची आहे, असे गोवा सरकारला लेखी दिले आणि कर्नाटक सरकारला दिलेले परवाने रद्दबातल करताना कर्नाटकने आतापर्यंत वळवलेले सत्तावीस टक्के पाणी पुन्हा गोव्याकडे वळते केले, तर आपण राजकीय संन्यास घेईन, असे माजी उपमुख्यमंत्री तथा मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी जाहीर केले.
कर्नाटक आणि केंद्र सरकारने म्हादईसंबंधीचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारला देऊन येत्या विधानसभा अधिवेशन सभागृहाच्या पटलावर ठेवल्यास आपण राजकीय निवृत्ती घेऊ, असे ढवळीकर यांनी ठामपणे सांगितले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण म्हादईचे आंदोलन छेडले नसून त्यात सर्व गोमंतकीयांचेच हीत आहे. उद्या म्हादईचे पाणी पूर्णपणे रोखले तर गोव्यावर विपरित परिणाम होईल. गोव्यातील माणसांबरोबरच पशू पक्षी आणि निसर्गाचे अस्तित्वही धोक्यात येईल, म्हणून म्हादई लढ्याला मगो पक्षाने प्राधान्य दिले असून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.