मौकापरस्ती

0
114

बाबूश मोन्सेर्रात यांनी गोवा फॉरवर्डमार्फत सत्तेची वाट चालायला सुरूवात केली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात आता ते पणजीची पोटनिवडणूक लढवणार नाहीत, त्यामुळे पर्रीकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे शिफारसपत्र जरी विजय सरदेसाई यांनी दिलेले असले, तरी बाबूश यांच्या गोवा फॉरवर्ड प्रवेशामुळे पर्रीकरांसाठी पणजीच्या पोटनिवडणुकीतील चुरस भले टळली असेल, परंतु भविष्याचा विचार करता गोवा फॉरवर्डमध्ये हा बाहुबली नेता येणे आणि नुसताच पक्षात नव्हे, तर पुन्हा पोटनिवडणुकीद्वारे आमदार बनून विधानसभेत येणे ही भाजपसाठी काही सुवार्ता म्हणता येत नाही. त्यांचे उपद्रवमूल्य सर्वविदित आहे. याच बाबूश मोन्सेर्रातनी भस्मासूर होऊन पर्रीकरांचे सरकार एकदा पाडले होते याचे सोईस्कर विस्मरण भाजपाच्या मंडळींना भले झाले असेल, परंतु जनता विसरलेली नाही. बाबूश लवकरच जनतेवर आणखी एक पोटनिवडणूक लादून गोवा विधानसभेत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे गोवा फॉरवर्ड मात्र बळकट बनला आहे आणि त्याची सौदेबाजीची आणि ब्लॅकमेलिंगची शक्ती वाढली आहे. त्याला काटशह देण्यासाठी कॉंग्रेसच्या काही आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे सत्कर्म भाजपा नेतृत्व करण्याची शक्यता आहे. विश्‍वजित राणे यांच्या भाजपप्रवेशामुळे त्या पक्षाची ताकद वाढली आहे. त्याच सोप्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करून सरकारचे स्थैर्य सांभाळण्याचा प्रयत्न आता भाजपा करू शकतो. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या मोदी आणि भाजपाची हवा असल्याने हे काही कठीण नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना मतदान करून काहींनी उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचे संकेत दिलेलेच आहेत. कॉंग्रेस आमदारांमधील ही चलबिचल म्हणजे गोव्यात पुन्हा एकदा संधिसाधूपणाचे मतलबी राजकारण सुरू झाल्याचे संकेत आहेत आणि हे जे काही शिजते आहे ते जनतेच्या भल्यासाठी चालल्याचे म्हणता येत नाही. राजकारणातील शत्रू हा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही कायमचा मित्र नसतो हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे बाबूश मोन्सेर्रातनी ऐनवेळी दगा दिल्याने कॉंग्रेसचा कितीही जळफळाट झालेला असो, हिंदीत ज्याला ‘मौकापरस्ती’ म्हणतात, त्याप्रमाणे परिस्थितीचा वापर स्वहितासाठी कसा करायचा याचे पक्के ज्ञान असलेल्या मोन्सेर्रात यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करून हा अचूक मोका साधला आहे. गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून राजकारणातून दूर फेकले जाण्याच्या धास्तीने बाबूश यांना घेरले होते. त्यामुळे पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे सगळे मार्ग त्यांनी चाचपून पाहिले. आधी कॉंग्रेसशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला. बाबूश हे आपल्या संपर्कात होते व विजय सरदेसाईंच्या मदतीने पर्रीकर सरकार पाडण्याचे आश्वासन देत होते असे कॉंग्रेस निरीक्षक चेल्लाकुमार यांनी नुकतेच उघड केले आहे. कॉंग्रेसने गेल्या महिनाभर चालवलेल्या टोलवाटोलवीमुळे आपण त्या पक्षापासून दूर गेल्याची प्रतिक्रिया स्वतः बाबूश यांनीच दिलेली आहे. बाबूश हे ‘गोंयकारपणाचे प्रतीक’ आहेत असे सरदेसाई म्हणाले. त्यांना भले आपण जे केले तो ‘मास्टरस्ट्रोक’ वगैरे वाटत असेल, परंतु त्यांची प्रतिमा यातून उजळण्याऐवजी कलंकितच झाली आहे याचे भान सरदेसाईंनी ठेवायला हवे. गेल्या निवडणूक निकालानंतर त्यांनी स्वतः जो मार्ग अनुसरला त्याच पठडीतले मोन्सेर्रात यांचे हे पाऊल आहे. तत्त्वांना तिलांजली देऊन पाहिलेली ही निव्वळ राजकीय सोय आहे. जनतेच्या मनात या घटनेची उमटलेली प्रतिक्रिया नकारात्मक आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवणे त्यांच्याच हिताचे ठरेल. क्षणिक फायद्यासाठी उचललेले पाऊल दूरगामी नुकसान तर करणार नाही ना हा विचार जरूर व्हावा.