स्थानिकांची वाहने, सुविधा वापरण्याची मागणी
नारोजीवाडा-मोरजी येथील एका हॉटेल परिसरात ‘स्वीटी हॉलिडे’ या मालिकेचे चित्रिकरण चालू असताना शुटींग वेंडर असोसिएशनच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन जनरेटर व पर्यटक टॅक्सी स्थानिकांच्या वापरा अशी जोरदार मागणी करत महाराष्ट्रातील जनरेटर वाहने हलवावीत अशी मागणी केली. वेळीच पेडणे पोलीस घटनास्थळी पोचल्याने संभाव्य अनुचित प्रकार टळला. शुटींग वेंडर संघटनेने पेडणे पोलीस स्टेशनवर आयोजकांच्या विरोधात लेखी निवेदन दिले.
याविषयी पेडणे पोलीस निरिक्षक तुषार लोटलीकर यांच्याकडे संपर्क साधला असता, संबंधितांकडे कोणकोणती कागदपत्रे आहेत. त्याची पडताळणी केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. नारोजीवाडा येथील एका हॉटेलमध्ये २७ पासून एका मालिकेचे चित्रीकरण चालू आहे. त्या चित्रिकरणासाठी लागणारे जनरेटरसहीत वेगवेगळी वाहने महाराष्ट्रातून आयोजकांनी आणल्याने शुटींग वेंडर संघटनेने आक्षेप घेत गोव्यातील जनरेटर वाहने वापरण्याची मागणी केली. २८ रोजी शुटींग वेंडर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजकांशी चर्चा करून स्थानिकांना व्यवसाय देण्याची मागणी केली होती. २८ रोजी स्थानिकांना व्यवसाय देण्याचे मान्य केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. २८ रोजी दुपारी १. वाजता शुटींग वेंडरचे काही कार्यकर्ते हॉटेल परिसरात जमले व चित्रिकरण थांबवून स्थानिकांना व्यवसाय द्यावा, अशी मागणी केली.
सदर चित्रिकरण २९ रोजी मोरजी व चोपडे परिसरात होणार असून त्यासाठी गोवा मनोरंजन सोसायटीकडून त्यांना परवाना देण्यात आला होता. परंतु २८ रोजी ज्या हॉटेलमध्ये चित्रिकरण चालू होते त्यास परवाना नव्हता. हॉटेल मालकांनी चित्रिकरणास हॉटेल परिसर वापरण्यास परवानगी दिल्याचे पत्र आयोजकांनी पत्रकारांना दाखवले.