मोफत पाणीपट्टीमुळे गोमंतकीयांचा सरासरी ६१ रु. फायदा : गोम्स

0
33

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी गोमंतकीयांना १ सप्टेंबरपासून मोफत पाणी देण्याची घोषणा केली आहे त्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला प्रती महिना जास्तीत जास्त ६१ रु. चा फायदा होणार आहे. त्यामुळे लोकांची अशी थट्टा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील दर एका कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे एल्विस गोम्स यांनी काल केली.

मोफत पाण्याच्या घोषणेविषयी बोलताना गोम्स म्हणाले की सरकारने लोकांना महिन्याला १६ हजार लिटर एवढे पाणी मोफत देण्याची घोषणा केली आहे. दर एका कुटुंबाला रोज १ हजार लिटर एवढे पाणी लागते. सरकारने पाणीपट्टीत वाढ करण्यापूर्वी राज्यातील लोकांना सरासरी १४६ रु. एवढे बिल येत असे. सरकारने पाण्याचे दर वाढवल्यानंतर हेच बिल २५६ रु. पर्यंत वाढले. आता सरकार १६ युनिटस म्हणजे १६ हजार एवढे पाणी मोफत देणार असल्याने लोकांना सरासरी पाण्यावर मासिक ६१ रु. एवढा फायदा होणार असल्याचे गोम्स यांनी स्पष्ट केले. ही लोकांची थट्टा असून सरकारने ती थांबवावी, अशी मागणी गोम्स यांनी केली असून त्याऐवजी राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गोम्स यांनी केली आहे.