>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पर्वरी येथे पत्रकार परिषदेत माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवार दि. ११ डिसेंबर रोजी गोव्यात आगमन होणार असून, या दिवशी त्यांच्या हस्ते मोप येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक महाविद्यालय व आयुष इस्पितळाचे उद्घाटन होणार आहे. तसेच मोदी हे त्यादिवशी नवव्या जागतिक आयुर्वेद महासभा (कॉंग्रेस) व आरोग्य एक्स्पोच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथील विधानसभा संकुलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
याशिवाय याच दिवशी गोव्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी गाझियाबाद, उत्तर प्रदेश आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपॅथी नरेला, दिल्ली या दोन संस्थांचेही उद्घाटन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. मोप विमानतळावर आतापर्यंत १२५० गोमंतकीयांना रोजगार प्राप्त झाला आहे. या विमानतळावरून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात मोप विमानतळावर वर्षाला ४४ लाख प्रवाशी, तर विमानतळ पूर्णपणे सुरू झाल्यानंतर वर्षाला ३ कोटी प्रवासी हाताळले जाऊ शकतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला किती वाजता मोप विमानतळाचे उद्घाटन करण्यात येईल, असे विचारले असता ते आत्ताच सांगणे शक्य नसून, त्याविषयीची माहिती नंतर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोप विमानतळासाठी २०१४ साली निविदा काढण्यात आली होती, तर १३ नोव्हेंबर २०१६ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिला बसवून कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. या विमानतळावर २८७० कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
विमानतळ ५ जानेवारीपासून प्रत्यक्षात सुरू
११ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोप विमानतळाचे उद्घाटन होणार असले, तरी प्रत्यक्षात विमानतळ ५ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. या विमानतळाला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचे ठरले आहे का, असे विचारले असता विमानतळाला कुणाचे नाव द्यायचे, त्याचा निर्णय केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयुर्वेद महासभा व आरोग्य एक्स्पोला ५ हजार प्रतिनिधींची हजेरी
८ डिसेंबरपासून पणजीत सुरू होत असलेल्या नवव्या आयुर्वेद महासभा व आरोग्य एक्स्पोला ५ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यात २०० विदेशी प्रतिनिधींचाही समावेश असेल. एकूण ३६ देशांतील प्रतिनिधी या महासभेत सहभागी होणार आहेत. त्यात १५० वक्त्यांचा समावेेश असेल व ४५० वैज्ञानिक प्रबंध सादर केले जातील. त्याशिवाय ६०० वैज्ञानिक पोस्टर्सही असतील. या आयुर्वेद महासभेचे कार्यक्रम कला अकादमी, आयनॉक्स प्रांगण, दरबार हॉल आदी ठिकाणी संपन्न होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
धारगळच्या आयुष इस्पितळाचे आभासी पद्धतीने होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन प्रत्यक्ष हजर राहून, तर धारगळ येथील आयुर्वेदिक महाविद्यालय व आयुष इस्पितळाचे उद्घाटन आभासी पद्धतीने करणार आहेत.