‘मोप’ पायाभरणीचा कार्यक्रम जाहीर

0
70

ग्रीनङ्गिल्ड मोप इंटरनॅशनल विमानतळाची कोनशिला बसविण्याचा सोहळा दि. १३ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. तत्पूर्वी, दि. ८ रोजी ८४ लाख ६८ हजार २६१ चौ. मीटर जमीन प्रकल्पाचे कंत्राटदार जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात देण्याचा समझोता करार होणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम २०१९-२० पर्यंत पूर्ण होईल, असे सांगून या टप्प्यात ४.५ दशलक्ष प्रवासी हाताळणे शक्य होईल, असे पार्सेकर यांनी सांगितले. पेडणे तालुका विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला होता. या प्रकल्पामुळे वारखंड, मोप, कासारवर्णे, चांदेल, उगवे, आंबेरे या भागांचा कायापालट होईल. मोप विमानतळ व तुये इलेक्ट्रॉनिक सीटी या प्रकल्पांमुळे प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नोकर्‍यांत स्थानिकांना प्राधान्य देण्याची अट डीपीआरमध्ये घालण्यात आल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. पीपीपी तत्त्वावरील या प्रकल्पामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. वर्षाकाठी २८ दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. ए – ३८ जंबोजेट विमाने उतरण्याची सुविधा या विमानतळावर असेल. विमाने उतरविण्यासाठी वेळेचेही बंधन नसेल. त्यामुळे तिकीटाच्या बाबतीत स्पर्धा राहील व त्याचा लाभ प्रवाशांना होईल, असे त्यांनी सांगितले. कोनशिला बसविण्याच्या सोहळ्यास १२ ते १३ हजार लोकांची उपस्थिती असेल, असे त्यांनी सांगितले.
मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्येक राज्यात इलेक्ट्रॉनिक सिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. वरील प्रस्तावाचे पालन करण्याच्या बाबतीत गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले होते. आता त्यात वाढ करण्यात आल्याने किमान ७० कोटी रुपये मिळतील. वरील दोन्ही प्रकल्पांचा ङ्गायदा केवळ पेडणेच नव्हे तर, बार्देश, डिचोली, सत्तरी या भागातील युवकांनाही होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
साड्या वाटणे गैर नव्हे
ऍड. रमाकांत खलप यांच्या कोणत्याही आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास आपले मन राजी होत नाही, असे सांगून भाऊबीजेची भेट म्हणून मांद्रे मतदारसंघातील भगिनींना साड्या पाठवून दिल्या हे सत्य आहे. त्यात काहीही गैर नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.