लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वास ठराव दाखल करून घेतल्यानंतर त्यावर सभागृहात आज चर्चा व मतदानही होणार असल्याने सत्ताधारी एनडीए व विरोधक या दोघांचीही ही सत्वपरीक्षा ठरणार आहे. उभयतांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी काल दिवसभर जोरदार डावपेच व हालचाली झाल्या.
अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर एनडीएतील घटक पक्ष शिवसेनेने सरकारविरोधात वक्तव्ये चालू ठेवली असली तरी भाजपाध्यक्ष अमित शहांच्या हस्तक्षेपानंतर शिवसेना एनडीएच्या बाजूने राहणार हे स्पष्ट झाले आहे.
तर अविश्वास ठरावाच्या बाजूने राहण्याचे कॉंग्रेस (४८), तेलगू देसम (१५), तृणमूल कॉंग्रेस (३४), राष्ट्रवादी कॉंग्रेस (७), माकप (९), एएपी (४) व राजद (४) यांनी निश्चित केले आहे. अन्य काही छोटे पक्ष मिळून ही संख्या १२९ एवढी होते. बीजू जनता दल (१९), टीआरएस (११) व सपा (७) यांनी अजून भूमिका उघड केली नाही. बहुमतासाठी संख्या २६६ अशी असून सभागृहातील १० जागा रिक्त आहेत. भाजपची सदस्य संख्या २७३ असून एनडीएची एकूण संख्या ३१४ अशी आहे.
सरकारला शिवसेनेकडून दिलासा
भाजपसाठी काल दिलासा मिळाला तो १८ सदस्य असलेल्या शिवसेनेकडून. अमित शहांच्या शिष्टाईनंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या बाजूने राहण्यास होकार दिला.
अभाअद्रमुकनेही एनडीएला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांचे ३७ सदस्य आहेत.