>> संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून
आज बुधवारपासून सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनातील विरोधकांच्या रणनीतीविषयी सोमवारी विविध विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सहभागी नेते अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या निर्णयाशी सहमत झाले असे खर्गे यांनी सांगितले. त्यानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. सध्या अविश्वास ठरावासाठी १२ पक्षांचा पाठिंबा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
या अधिवेशनात कॉंग्रेस महिला सुरक्षा, बेरोजगारी, जमावाकडून केल्या जाणार्या हत्या, शेतकर्यांची परिस्थिती, अनुसूचित जाती जमाती अत्याचारविरोधी कायदा, महागाई, इंधन दरवाढ तसेच स्वीस बँकेत भारतीयांच्या ठेवींमध्ये झालेली मोठी वाढ अशा विविध विषयांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्व मुद्दे अविश्वास ठरावात समाविष्ट केले जाणार असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले.
कामकाज झालेले आम्हाला हवे
विरोधी पक्ष सभागृहाचे कामकाज चालू देत नाही असे वारंवार म्हटले जाते. पंतप्रधानांसह त्यांचे सहकारी सतत याबाबत बोलत असतात. मात्र जेव्हा आम्ही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतो तेव्हा यापासून पळ काढण्यासाठी सरकारकडून नवनवीन युक्त्या शोधल्या जातात. त्यामुळे आम्हाला सभागृहाचे कामकाज सुरू ठेवायचे असून जनतेचे सर्व प्रश्न मांडायचे आहेत असे खर्गे म्हणाले.
जमावाकडून हत्यांचा
विषय उपस्थित करणार
जमावाकडून हत्या केल्या जातात व केंद्रीय मंत्रीही त्याचे समर्थन करतात हा मुद्दा आम्ही सभागृहात उपस्थित करू इच्छितो याकडे त्यांनी लक्ष वेधले. किती रोजगार उत्पन्न झाले व कितीजणांना रोजगार मिळाला हेही आम्ही विचारणार असे ते म्हणाले.