मोदींच्या सभेला 50 हजार लोकांची उपस्थिती

0
40

>> मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त; मडगावातील सार्वजनिक सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप मुख्यालयात घेतली आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवार दि. 6 फेब्रुवारी रोजी मडगावात होणाऱ्या जाहीर सभेला 50 हजारांपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती लाभणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. भाजप मुख्यालयात घेतलेल्या एका आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 6 फेब्रुवारी रोजी दक्षिण गोव्यातील बेतुल येथे आयोजित दुसऱ्या भारतीय ऊर्जा परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते विकसित भारत मोहिमेंतर्गत मडगाव येथे आयोजित सार्वजनिक सभेत सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 4 प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काल भाजप मुख्यालयात एक आढावा बैठक घेण्यात आली.
गोवा भाजपतर्फे काल आयोजित आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची मडगावातील सभा, भाजपचे गाव चलो अभियान आणि लोकसभा निवडणुकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मडगावातील सभा हा सरकारी कार्यक्रम आहे. विकसित भारत-2047 च्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून राज्यातील मंत्री, भाजप आमदार, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 6 फेब्रुवारीला दुपारी 1.30 वाजता सभेला सुरुवात होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

9 पासून चलो गोवा अभियान
या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9 ते 12 फेब्रुवारी या काळात गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होऊन मंत्री, आमदार आणि पदाधिकारी ग्रामीण जनतेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भाजप पदाधिकारी जाणार अयोध्येत
राज्यातील भाजप पदाधिकारी येत्या 12 आणि 26 फेब्रुवारी अशा दोन दिवशी अयोध्येतील श्री राममंदिराला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर स्थानिक नागरिकांना सरकारमार्फत राम मंदिर दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद, माजी खासदार तथा सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दामू नाईक उपस्थित होते.