मोदींचा परिवार 140 करोड , काँग्रेसचा परिवार गांधी – नेहरू

0
7

भाजप गोवा प्रभारी सी. टी. रवी यांची टीका

डिचोलीत भाजपतर्फे व्यापारी संमेलन संपन्न

निधी, नेता व नियत या तीन गोष्टी महत्त्वाच्या असून देश प्रथम ही भाजपची नीती आहे. काँग्रेसची नीती परिवार प्रथम आहे. मोदींचा परिवार 140 करोड तर काँग्रेसचा परिवार गांधी – नेहरू आहे, अशी टीका भाजप गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी केली. देशाला व जगाला आज मोदींची गरज असून 2024 निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लाट येणार असून सर्वांनी त्यांचे हात बळकट करावेत असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्षातर्फे सेवा सुशासन, गरीब कल्याण अंतर्गत डिचोलीत व्यापारी संमेलन संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना रवी बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानवडे, गोवा प्रभारी सी. टी. रवी, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी आमदार दयानंद सोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोदींमुळे क्रांतीपर्व : श्रीपाद
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मोदींमुळे देशात क्रांतीपर्व सुरू झाले आहे. आज देश सर्वच क्षेत्रांत प्रगती साधण्याबरोबरच विश्वगुरू होण्याच्या वाटेवर आहे. व्यापारी वर्गाच्या आधारावर देशाने मोठी उंची गाठलेली आहे. भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी बदललेली असून आज सारे जग भारताकडे आदराने पहाते, असे त्यांनी सांगितले.

सदानंद तानवडे यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी लोकसंवाद साधण्यात येत असल्याचे सांगून लोकसंपर्क वाढवणे, डबल इंजिन सरकारची उपलब्धी, देश पातळीवर करीत असलेली कामे, विकासाच्या योजनांना मोठी चालना दिलेली आहे असे सांगितले. भाजप नेते व लोकप्रतिनिधींनी संवेदनशील बनावे व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

दयानंद सोपटे यांनी स्वागत केले व मोदी सरकारच्या नऊ वर्षांचा कार्याचा आढावा घेतला.
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून नऊ वर्षांत मोदींच्या धोरणामुळे भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे सांगून सर्वांगीण विकासात देशाने मोठी झेप घेतल्याचे सांगितले.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सेवा सुशासन अभियान व एकूणच देशाची प्रगती साधण्यात मोदींच्या कुशल नेतृत्वामुळे मोठे यश आल्याचे सांगितले.

या वेळी व्यापारी वर्गाने आपल्या समस्या मांडल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व समस्यांची उत्तरे देताना आवश्यक बदल करण्यात येईल असे आश्वासन दिले. पंचेचाळीस हजार लोकांनी जीएसटी नोंदणी केली असून अजून 65 हजार नोंदणी करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

सिद्धेश राऊत यांनी पालिका कायद्यात बदल करण्यात यावेत अशी मागणी केली. अनिल वेंगुर्लेकर, पांडुरंग सावंत, भगवान हरमलकर, विनायक शिरोडकर, विवेक नाईक, प्रज्योत शिलकर यांनी समस्या मांडल्या.