मोदींकडून पर्रीकरांच्या प्रकृतीची विचारपूस

0
133

>> प्रकृती स्थिर; विश्रांती घेण्याचा सल्ला

मुंबईस्थित लीलावती इस्पितळात उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्पितळात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, पर्रीकरांबाबत ज्या काही बातम्या येत आहेत त्या सर्व अफवा असल्याचे लीलावती रुग्णालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. पर्रीकरांच्या आरोग्याविषयी काल विविध दूरचित्रवाणी वाहिन्या व सोशल मिडियावर बरीच चर्चा होती. मात्र, पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सर्व ते उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली चालू आहेत. पर्रीकर यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नसून डॉक्टरांनी त्यांना तसा सल्ला दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे वृत्त ही केवळ एक अफवा असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.

विश्रांती घेण्याचा सल्ला
पर्रीकर यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांना सध्या पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे ते सध्या उपचारासाठी मुंबईत राहणार असून गोवा विधानसभा अधिवेशनाला हजर राहणार नसल्याचे उपसभापती मायकल लोबो यांनी काल बोलताना सांगितले. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने गोवा फॉरवर्ड व मगो ह्या भाजप सरकारातील घटक पक्षांच्या नेत्यांतही काल चिंतेचे वातावरण होते. गोवा फॉरवर्डचे नेते व मंत्री विजय सरदेसाई, मगोचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यापूर्वीच मुंबईतील लीलावती इस्पितळात जाऊन पर्रीकर यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. पर्रीकर यांची प्रकृती बरी असून चिंता करण्याची गरज नसल्याचे काल ढवळीकर यांनी सांगितले. सोमवारी (आज) अधिवेशन होणार असून नंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. बैठकीत अधिवेशनाबाबत काय करायचे त्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.