मॉन्सूनचे आगमन ५ जूनला शक्य

0
112

राज्यात मोसमी पावसाचे आगमन येत्या ५ जूनला होण्याची शक्यता येथील हवामान विभागाने काल व्यक्त केली आहे. हवामान खात्याने नवीन अंदाजानुसार केरळमध्ये येत्या १ जूनला मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता गुरूवारी व्यक्त केली आहे.

मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असल्याने मोसमी पावसाचे आगमन वेळेवर होण्याची शक्यता गोवा हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविली आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने केरळमध्ये मोसमी पावसाचे वेळेवर आगमन होण्याचे संकेत आहे. उत्तरेच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा कायम राहिल्यास गोव्यात नियोजित वेळेवर मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते, असेही हवामान विभागाचे म्हणणे आहे.

मोसमी पावसाचे बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात आगमन झाले आहे. मोसमी पाऊस केरळच्या दिशेने सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. राज्यातील काही भागात येत्या ३१ मे, १ जूनच्या आसपास जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी २९ मे ते १ जून दरम्यान पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात जाऊ नये, असा सूचना केली आहे.

मॉन्सूनचे केरळात
१ जूनला आगमन शक्य
नवी दिल्ली : यंदा मोसमी पावसाचे १ जून रोजी केरळमध्ये आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या बुधवारपासून सक्रीय झाल्यानंतर मोसमी पावसाने मालदिवसह, बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटे अशी आगेकूच केली असल्याची माहिती खात्याने दिली आहे. मोसमी पावसाची आगेकूच ३१ मे ते ४ जूनपासून सुरू होणार आहे.