मॉडेल सिध्देश जुवेकरला सशर्त जामीन

0
93

एका अनाथ मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षाचा कारावास ठोठावलेला मॉडेल सिध्देश जुवेकर याला काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. जुवेकर याने वरील शिक्षेला उच्च न्यायालयाला आव्हान देणारी याचिका दाखल केलेली आहे. न्यायमूर्ती जी. व्ही. भडंग यांनी काल त्याला हा सशर्त जामीन मंजूर केला.

जात मुचलका व ५० हजार रु.च्या वैयक्तिक हमीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन आठवड्यांच्या आत त्याला कोर्टात ७ लाख रु. जमा करण्याचा व दंडाचे १५ लाख रु. भरण्याचाही आदेश देण्यात आला आहे. तसेच पारपत्र न्यायालयात जमा करण्याची सूचनाही त्याला करण्यात आलेली असून पीडित युवतीशी तसेच साक्षीदारांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क न साधण्याचाही आदेश त्याला देण्यात आलेला आहे.
दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर सिध्देश जुवेकर याची रवानगी कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली होती. वरील न्यायालयाने जुवेकर याला कलम ३७६ (बलात्कार) व ४२० (फसवणूक) या कलमाखाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती. सिध्देश जुवेकर हा एक मॉडेल असून गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या मिस्टर इंडिया स्पर्धेत तो विजेता ठरला होता.