नेत्रावळी अभयारण्य कक्षेत येणाऱ्या मैनापी धबधब्यावर काल रविवारी दुपारी दोघेजण बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडल्याने मैनापी धबधबा ओसंडून वाहत आहे. याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते. यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे.
फोंडा येथील एलआयसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पंधराजणांचा एक गट मैनापी धबधब्यावर सहलीसाठी आला होता. सकाळी अकरा वाजता हा गट आला होता. त्यातील जनार्दन सडेकर हे अधिकारी धबधब्याच्या पाण्यात बुडत असलेल्या शिवदत्त नाईक (24, वास्को) या सहकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचाच बुडून मृत्यू झाला. सडेकर हे चांगले पोहणारे होते. मात्र पाण्याच्या प्रवाहात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवू शकले नाहीत आणि त्यांचाही बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या दोघांपैकी सडेकर यांचा मृतदेह सापडला आहे. तर शिवदत्त नाईक यांचा शोध घेणे सुरू आहे.
सडेकर यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनसाठी पाठवून दिला असून शिवदत्त याचा शोध घेणे सुरू आहे.