- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
स्वरसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. गेली ६ दशके त्यांनी भारतीय संगीतात अधिराज्य गाजवले. नाम गुम जायेगा.. चेहरा ये बदल जायेगा… मेरी आवाज ही पहचान है…हे त्यांचे स्वर शब्दशः खरे ठरले आहेत. गेल्या तीन पिढ्यांची सकाळ लतादीदी यांच्या विविध भारतीवर लागणार्या गाण्यांनी व्हायची. पहाटे उठल्यापासून ते शाळेला जायच्या तयारीपर्यंत लतादीदींचा स्वर कानात गुंजत असायचा. सुमारे ९०० पेक्षा अधिक चित्रपटांत आपला स्वर दिलेल्या लतादीदींचा आवाज पुढील अनेक पिढ्या गुंजत राहील. लतादीदींनी भावगीत, भक्तिगीत, द्वंद्वगीत, युगलगीत, गझल अशा सर्व प्रकारच्या संगीतात आपले वर्चस्व सिद्ध केले.
लतादीदींचे बंधू हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेली गणेशाची आरती तर गेल्या चाळीस वर्षांपासून घराघरांत ऐकली जाते. त्यानंतर शेकडो गायकांनी आरती म्हटली पण लतादीदींच्या स्वरांची उंची आणि भावूकता कोणालाही गाठता आली नाही. त्यांचे आपल्यातून असे निघून जाणे मनाला केवळ दुःखच देणारे नव्हे तर यातना देणारे देणारे आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना!
संगीत क्षेत्रात मोठी पोकळी
- गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री
आमच्या मंगेशी गावच्या सुकन्या असलेल्या लता मंगेशकर म्हणजे संगीत क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व होय. त्यांनी आपल्या गायकीमुळे गोव्याचे नाव सातासमुद्रापार नेले. त्यांचे संगीत क्षेत्रातील कार्य पाहून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा यथायोग्य असा गौरव केला होता. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीतात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे उद्गार गोव्याचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काल काढले. तमाम गोमंतकीयांना त्यांचा सार्थ अभिमान असून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशा शब्दांत मंत्री श्री. गावडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दैवी स्वर निमाला
- दशरथ परब -अध्यक्ष, आयएमबी
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या रूपाने एक दैवी स्वर निमाला आहे. मात्र हा स्वर अजरामर आहे आणि तो दाही दिशांमध्ये गुंजन करत राहील अशा शब्दांत इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे (आयएमबी) अध्यक्ष दशरथ परब यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
लतादीदी गीतांतून अमर
- पं. कमलाकर नाईक, ज्येष्ठ शास्त्रीय गायक
लतादीदी गेल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. या गोमंतकीय सुकन्येने आपल्या स्वरांनी सार्या जगाला मोहिनी घातली. त्यांच्या जाण्याने झालेली हानी कधीच भरून येणार नाही. तिची गाणी ऐकूनच आम्ही संगीताकडे आकृष्ट झालो. किंबहुना शास्त्रीय संगीताचा प्रवास त्यांच्या स्वरांच्या सततच्या गुंजनातून झाला. १९८५ मध्ये त्या कला अकादमीत आल्या होत्या तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. त्या गेल्या असल्या तरी त्यांच्या गीतांच्या माध्यमातून त्या अमर आहेत.
लखलखते भूषण हरपले
- आनंद वाघुर्मेकर
अध्यक्ष, गोमंतक मराठा समाज
गानतपस्वी, भारतरत्न गोमंतकीय सुपुत्री लता मंगेशकर म्हणजे एक अद्भुत चमत्कार होत्या. मंगेशकरांचा गोवा ही ओळख जगाला दिलेल्या लतादीदींचा सूर आज अनंतात विलीन झाला आहे. आमच्या समाजाचे लखलखते भूषण आज हरपले आहे.
पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी भवनाचा शीलान्यास लतादीदींच्या शुभहस्ते पार पडून वास्तू तयार झाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. दीदींच्या निधनाबद्दल तत्कालीन मराठी भवन निर्माण समिती त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर लतादीदींच्या आत्म्याला शांती देवो!
- दिलीप धारवाडकर,
तत्कालीन कोषाध्यक्ष, भवन निर्माण समिती.