मेपर्यंत लोकायुक्तांची नेमणूक : मुख्यमंत्री

0
89

>> पदभरतीची प्रक्रिया सुरू

मे महिन्यापर्यंत राज्यात लोकायुक्तांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. खरे म्हणजे १६ एप्रिलपर्यंत लोकायुक्तपद भरण्यात येणार होते. पण काही अडचणींमुळे सरकारला ते शक्य झाले नाही. मात्र, आता मे महिन्यापर्यंत हे पद भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या पदासाठी कुणाची नावे चर्चेत आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पदासाठी तीन नावे चर्चेत आहेत. त्यापैकी एक नाव निवृत्त न्यायाधीश पी. के. मिश्रा यांचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोव्याचे लोकायुक्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी वैयक्तिक कारणास्तव १६ ऑक्टोबर २०१४ रोजी पदत्याग केला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. मुख्य माहिती अधिकारी, राज्य माहिती अधिकारी तसेच लोकायुक्त व उपलोकायुक्त ही पदे भरण्यात यावीत या मागणीसाठी गोवा आरटीआय फोरमने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे.