मृत्यूचाही सोहळा व्हावा…

0
669
  • देवेश कडकडे

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात मृत्यूच्या सोहळ्याविषयी म्हणतात, ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा| तो सोहळा झाला अनुपम्य॥ अंतिम क्षणाचा हा सोहळा आनंदाने आणि तृप्त मनाने अनुभवण्याचा हा हक्क का नाकारावा?

‘इच्छामरणासाठी कायदा करावा’ हा श्री. मनोहर सावंत यांचा लेख ‘मृत्यूबद्दलच्या सत्यतेला सामोरे जाण्याच्या विचारांचे परखडपणे समर्थन करणारा आहे. तरीही या विषयावर सांगोपांग विचार होणे तितकेच आवश्यक आहे. इच्छामरण आणि दयामरण यात बरेच अंतर असल्याने त्यात गल्लत होते आणि या विषयात जे फायदे आणि तोटे आहेत, त्या दोन्ही बाजूंनी परखड भूमिका मांडणे आणि यावर जागृती निर्माण करणे की ज्यातून जनतेच्या मनातल्या संशयांना थारा राहणार नाही.
दयामरणात असाध्य आजारापासून उद्भवणार्‍या शरीरातील वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी दयाळूपणे हा प्रकार अंमलात आणला जातो. तर इच्छामरण हे स्वतःची जगण्याची इच्छा संपुष्टात आल्याची भावना निर्माण झाल्यानंतर मृत्यूला सामोरे जाणे. विदेशात या विषयावर सविस्तर अशी खुली चर्चा झाली. आपल्या देशात आता या विषयाला निदान वाचा तरी फुटली हेही नसे थोडके!

दयामरण हा कायदा सर्वप्रथम नेदरलँड या देशात आणि बेल्जियममध्ये पारित झाला. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला येणारा प्रत्येक प्राण्याचा कधी ना कधी मृत्यू अटळ असतो. जीवनाच्या अशाश्‍वत रूपामध्येच जीवन विमा पॉलिसीची संकल्पना आली आणि आज ती आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक बनली आहे. ‘जगातील सर्वांत मोठे आश्‍चर्य कोणते?’ या यक्षप्रश्‍नावर धर्मराज युधिष्ठीरनी उत्तर दिले की, मृत्यू अटळ असूनही मनुष्य अमर असल्यासारखा वागत असतो.

भगवद्गीता सांगते- जसे जिर्ण वस्त्र सांडून नवे वस्त्र पांघरावे तसा हा चैतन्यरूपी आत्मा नवीन देह स्वीकारत असतो. ओशो रजनीश याचे ‘मनुष्य कधीही जन्माला येत नाही आणि कधीही मरत नाही’ हे तत्त्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. जन्म ते मृत्यू हा प्रवास हेच एक मनुष्याला पडलेले कोडे आहे. मृत्यूमुळे या प्रवासाला एका गूढतेचे वलय निर्माण झाले आहे. आत्मा, आत्म्याचे अमरत्व आणि पुनर्जन्म हे वेदांनी मान्य केले असून त्यावर हिंदूधर्माचा पाया उभा आहे. असे असूनही मृत्यू या कल्पनेने मनुष्याची घाबरगुंडी उडते. आज मरणाची कल्पना पचविणे सहज शक्य नसते. ‘मृत्यू’ सारखा दुसरा अभद्र शब्द कोणताही नसावा. त्यामुळे असले विचार मांडणार्‍यांना भावनाशून्य म्हटले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा एखादाच, जो ही संकल्पना अगदी ५० वर्षांआधी सर्वांचा प्रचंड विरोध धुडकावून स्वीकारण्याचे धाडस दाखवू शकतो. ‘जीव असेल तर भीक मागून खाईन’ अशी विचारधारा स्वीकारली तर यावर चर्चाही संभवत नाही. मरण येत नाही, जगणं असह्य होऊन ज्यांची मृत्यूशिवाय सुटका नाही अशा जगणार्‍यांची संख्या वाढत असल्यामुळे इच्छामरणाची मागणीही जोर धरू लागली. त्यामुळे न्यायालयाला त्याची दखल घेणे भागच पडले. जीवन जगण्याचा जसा मूलभूत हक्क आहे, तसा परिस्थितीजन्य वेळेत मरणाचाही हक्क आहे, असा मानणारा वर्ग आहे. शिक्षेच्या नावाखाली कायद्याने फाशी दिली जाते, परंतु दयेपोटी मृत्यूदान आणि इच्छामरण ही कल्पना समाजाला आणि कायद्याला फारशी रुचत नाही.

माणसाच्या शरीरातले सगळे चैतन्य हरवत राहिलेले. फक्त लुळे झालेले, खुरडत राहणारे आणि मृत्यूची वाट पाहत राहणारे मृत्यूची भीक मागतात आणि आपण त्यांना वाचविण्यासाठी धडपडत असतो. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळलेे होते’ हे कविवर्य सुरेश भट यांचे गीत खूप काही सत्य सांगून जाते. जैन समाज ‘इच्छा मरणाचे’ समर्थन करतो. महावीर जैन म्हणतात- जीवन तर उत्सव आहे, तर मृत्यू महोत्सव आहे. हसत हसत जगणे आणि हसत हसत मरणे ही महावीरांची शिकवण असल्यामुळे ‘संथारा’ या माध्यमातून ‘इच्छामरण’ स्वीकारण्याची परंपरा जैन धर्मात आहे.

मनुष्य हा आपल्या जन्मोजन्मीचे कर्म भोगित असतो. त्यामुळे कर्माच्या सिद्धांतात हस्तक्षेप करणे ईश्‍वरी इच्छेनुसार वागण्याला छेद देणारे आहे आणि आपला माणूस आपल्याला हवा असतो. योग्य वेळ आली तरी मृत्यूचा स्वीकार करण्याचे धैर्य अजून तरी आपल्यात आलेले नाही. त्यामुळे कसल्याही स्थितीत मृत्यूला दूर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न होत असतात. आज महागड्या आरोग्य सुविधांमुळे गरीबांना, मध्यमवर्गीयांना जगण्याचा हक्क परवडत नाही. सरकार मदत करत नाही आणि मरणाला मान्यता देत नाही अशा विचित्र कात्रीत सापडले आहेत. हातपाय धडधाकड असताना, मनावर ताबा असताना मरण येणे, हे सुद्धा नशिबात असावे लागते, असेही बोलले जाते. जोपर्यंत जगण्यात मजा आहे, तेव्हाच जीवनाची इतिश्री करून मृत्यूच्या स्वाधीन देह करावा, असा मानणारा एक वर्ग, तर बर्‍यावाईट परिस्थितीतही जीवनाची साथ निभावली पाहिजे.

आज विज्ञानाने अनेक असाध्य आजारांच्या असह्य वेदना कमी करण्याची औषधे उपलब्ध केली आहेत. जीवनाला कंटाळून जीवन संपवणे म्हणजे पलायनवादाला प्रोत्साहन देणारे असून ती आत्महत्याच आहे, असे मानणारा दुसरा वर्ग आहे. आज या कायद्याचा सदुपयोग किती काळजीने आणि गांभीर्याने केला जाईल हा विचार तितकाच महत्त्वाचा आहे. आज सगळ्याच बाबतीत मालमत्तेच्या हव्यासामुळे हेराफेरी होते. त्यात याबाबतीत ही शक्यता आहे. आज कुटुंब व्यवस्था नष्ट होत चालली आहे. त्यामुळे एकाकी आई-वडील, आजी-आजोबा एकतर वृद्धाश्रमात राहतात, किंवा त्यांच्यासाठी महिन्याला २०-३० हजार रुपये देऊन केअर टेकर ठेवतात. यांची मुलं एक तर नोकरी करतात किंवा विदेशात असतात. त्यातील काही वृद्ध वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळलेले असतात. जिवंतपणी मरण भोगतात. वेदना हेच त्यांचे जीवन असते. यामुळे त्याच्यात नैराश्य पसरते. आज अनेकांना घरातील वृद्ध नकोसे झाले आहेत. त्यांच्या सुखी संसारात ते त्यांना अडगळ वाटतात. अशावेळी त्यांना इच्छामरणासाठी दबावाने प्रवृत्त केले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मृत्यूपत्रात ‘इच्छामरणाची नोंद करण्याचा अधिकार’ दिला आहे.

असाध्य आजार, ज्यावर इलाजच शक्य नाही, तेव्हा घरातील एका सदस्यांच्या सांगण्यावरून डॉक्टर असा सल्ला देऊ शकतात. रुग्णांच्या स्थितीबद्दल निरीक्षण, चर्चा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल अगदी प्रत्यक्ष जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णाबद्दल अंतिम निर्णय दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यासाठी अनेक अटींची काटेकोरपणे पूर्तता करण्याची कडक तरतुद असल्यामुळे न्यायालयाने यातून इच्छामरणाला प्रोत्साहन दिले आहे, हे मानणे चुकीचे आहे आणि इच्छामरणाने मरण स्वीकारणार्‍यांची संख्या वाढेल हा समज निरर्थक आहे. आज आपण अनेक जुन्या पूर्वापार भाबड्या समजुती कालबाह्य करून ‘टेस्ट ट्युब बेबी, अवयव दान’ या आधुनिक गोष्टी स्वीकारल्या. संपूर्ण देहदान करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. आज असा कुठलाही कायदा नाही, ज्याचा गैरवापर होऊन तो पायदळी तुडवला जात नाही. आज अनेक इच्छामरणाच्या याचिका सरकारकडे पडून आहेत. त्याच्यावर गंभीरपणे विचार केला तर वेदनेने तळमळणार्‍यांना हा कायदा एक वरदान ठरेल. आपण सुखाने जगावे, त्याचबरोबर मरणही सुखाने यावे अशी इच्छा बाळगली तर काय हरकत आहे?
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात मृत्यूच्या सोहळ्याविषयी म्हणतात, ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा| तो सोहळा झाला अनुपम्य॥ अंतिम क्षणाचा हा सोहळा आनंदाने आणि तृप्त मनाने अनुभवण्याचा हा हक्क का नाकारावा?