मृत्युसत्र कसे रोखाल?

0
288

गेले काही दिवस राज्यामध्ये चाललेले कोरोनाचे मृत्युसत्र जनतेची चिंता वाढवणारे आहे. गेल्या एक सप्टेंबरपासून पहिल्या आठ दिवसांत राज्यात ६४ जणांचा मृत्यू ओढवला आणि एकूण मृतांची संख्या २५६ वर गेली. इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम आरोग्य सुविधा असलेल्या गोव्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाने मृत्यू ओढवणे हे भूषणावह नाही. मंगळवारी दिवसभरात तब्बल अकरा जणांचा मृत्यू झाला. वाढती रुग्णसंख्या आणि वाढती मृत्युसंख्या या दोन्ही गोष्टींमुळे जनता नक्कीच चिंतित आहे आणि ती चिंता वृथा नाही.
गणेश चतुर्थीनंतर रुग्णांची संख्या पाचशेच्या वर जाऊन पोहोचताच ती कमी दाखवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण अर्ध्यावर आणले गेले. शिवाय रुग्णसंख्या तीनशे असेल तर उर्वरित तीनशे-चारशे रुग्णांचे अहवाल प्रलंबित दाखवण्याची क्लृप्तीही आरोग्य खात्याकडून रोज अवलंबिली जाते आहे. पण हे प्रलंबित अहवाल आणि चाचणीसाठी पाठवलेले नमुने यांचे गणित दुसर्‍या दिवशी प्रत्यक्षात मिळालेले अहवाल आणि प्रलंबित अहवाल यांच्याशी मुळीच जुळत नाहीत. हा घोळ रोज चालला आहे, परंतु आरोग्य खात्याला त्याची फिकीर दिसत नाही.
कोरोनाने राज्यात मृतांची संख्या वाढू लागताच सुरवातीला सरकारने ते सगळे रुग्ण वयोवृद्ध असल्याचा पवित्रा घेतला, नंतर मरण पावणारे ‘को-मॉर्बिड’ म्हणजे इतर आजार असलेले आहेत असे सरकार सांगू लागले. आता आरोग्यमंत्री सांगत आहेत की हे रुग्ण उपचारांसाठी उशिरा येत असल्याने मृत्युमुखी पडत आहेत. उद्या मंत्रिमहोदय ‘मरण कोणाला चुकले आहे? प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचेच आहे!’ असे म्हणू लागले तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.
राज्यामध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडणार्‍यांची आकडेवारी तपासली तर त्यामध्ये साठ वर्षांखालील रुग्णांची संख्याही मोठी दिसते. त्यामुळे वयोवृद्धतेचा दावा फोल आहे. बहुतेकांच्या मृत्यूचे कारण न्युमोनिया, ब्रॉंकायटीस, रेस्पिरेटरी फेल्युअर, ऍक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम वगैरे वगैरे वैद्यकीय परिभाषेत दिले जात असले तरी शेवटी ही सगळी गुंतागुंत कोरोनामुळेच निर्माण झालेली असते. मग को-मॉर्बिडिटीचे कसले पांघरुण त्यावर ओढता आहात? खरा प्रश्न या रुग्णांचे मृत्युसत्र कसे थोपविता येईल हा आहे. त्यासाठी प्राणवायू पुरवठा करण्याची साधने कमी आहेत का, व्हेंटिलेटर कमी पडत आहेत का, रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत का? डॉक्टर कमी पडत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आग लागल्यावर विहीर खोदायला धावावे तशी कोरोना रुग्णांची संख्या हाताबाहेर जाताच आता आरोग्य खात्याची धावपळ चालली आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळही अखेर कोविड इस्पितळात रुपांतरित करण्याची पाळी ओढवली आहे. नव्या डॉक्टर व परिचारिकांची भरती चालली आहे. तातडी असल्याने वैद्यकीय उपकरणे आणि साधनांची चढ्या दराने खरेदीही होईल. रुग्ण व्यवस्थापनात खासगी एजन्सींचा तर सुळसुळाट झालेला आहे.
राज्यात मृत्यूचे प्रमाण वाढताच प्लाझ्मा थेरपीचा अवलंब सरकारने केला. वाढते मृत्यू त्यातून थांबवता येतील असा दावा करण्यात आला. कोरोनातून बरे झालेले लोक प्लाझ्मा दान करायला पुढे होत नाहीत असे दिसताच पोलीस आणि इतर सरकारी कर्मचार्‍यांना प्लाझ्मा दानाची सक्ती चालली आहे. पण प्लाझ्मा उपचारपद्धती ही मृतांचे प्रमाण रोखण्यास समर्थ नाही असा निष्कर्ष नुकताच भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने म्हणजे आयसीएमआरने काढलेला आहे. या पार्श्वभूमीवर हे वाढते मृत्युसत्र रोखण्यासाठी सरकार काय करणार आहे??