मुळगाव व लामगाव खाणपट्ट्यातील घरे व मंदिरे लिजमधून वगळणार

0
14

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

डिचोली येथील खाण ब्लॉक-1 या मुळगाव व लामगाव या खाणपट्ट्यात येणारी घरे व मंदिरे लिजातून वगळण्यात येणार असून त्यांना पूर्ण अभय मिळणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासाला डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी सदर लिजमधील घरे व मंदिरांचा प्रश्न उपस्थित केला होता. मुळगाव, लामगाव, शिरगाव येथील लोकांनी चिंता करू नये. जमीन मालकांनी आपले सर्व्हे क्रमांक दिलेले नाहीत. ते त्यांनी द्यावेत अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. खाण लिजधारकांनी आपल्या लिज क्षेत्रात येणाऱ्या घरांना व मंदिरांना अभय देण्याची तयारी दाखवली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना चंद्रकांत शेट्ये म्हणाले की, सरकारला महसूल मिळणार असल्याने सरकार खुश आहे. तसेच लिजधारकांना भरपूर पैसा मिळणार असल्याने तेही खुश आहेत. मात्र, लिज क्षेत्रात ज्यांची घरे व मंदिरे आहेत ते चिंतेत असल्याचे शेट्ये यांनी नजरेस आणून दिले. याप्रकरणी सरकार तेथील जनतेबरोबर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.